राज्याच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधली सुंदोपसुंदी काहीकेल्या थांबायचं नाव घेत नाहीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलेला स्वबळाचा नारा आणि शरद पवार हेच महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल असल्याचं म्हणत आणखी एका वादाला तोंड फोडलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी पटोलेंच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
ADVERTISEMENT
“शरद पवार हेच महाविकास आघाडीचे जनक आहेत. त्यांच्यात नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करतंय. बाकी कोण काय बोलतं यावर सतत खुलासा देणं योग्य ठरणार नाही.” यावेळी प्रफुल पटेल यांनी नाना पटोलेंचं नाव न घेता त्यांच्या दररोजच्या विधानांमुळे फारकाही फरक पडेल असं वाटत नाही असा टोलाही लगावला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोलेंनी भाजपच्या तिकीटावर प्रफुल पटेलांचा पराभव केला होता.
यावेळी नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या वक्तव्यांचा समाचार घेत असताना प्रफुल पटेलांनी काँग्रेसवर चांगलीच तोफ डागली. “एच.के.पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. त्यामुळे ते जे बोलतात त्याला मी जास्त महत्व देतो. कारण काँग्रेस हायकमांडने त्यांना महाराष्ट्राचा प्रभारी म्हणून पाठवलं आहे.” काही दिवसांपूर्वी एच.के.पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत नाना पटोलेंच्या स्वबळाच्या वक्तव्यावर चर्चा झाल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT