शिंदेंसह 40 आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलून गेली आहेत. शिवसेनेविरोधातल्या बंडखोरीसाठी शिंदे गटाकडून सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार ठरवलं जात आहे. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलंय.
ADVERTISEMENT
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवण्यासाठी भाजपकडून राबवल्या जात असलेल्या रणनीतीबद्दल भाष्य केलं.
भाजपनं राष्ट्रीय स्तरावर 144 लोकसभा मतदारसंघ निश्चित केले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजप उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता, अशा मतदारसंघाची निवड करण्यात आलीये. या मतदारसंघावर भाजपनं लक्ष्य केंद्रीत केलं असून, यासाठी लोकसभा प्रवास योजना हाती घेतलीये. या मतदारसंघात महाराष्ट्रातील 16 मतदारसंघांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक जागा आणि विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट भाजपनं ठेवलं असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर आगामी सर्व निवडणुका भाजप एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे 100 आमदार निवडून आले असते… बावनकुळे नक्की काय म्हणाले?
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. बावनकुळेंनी मोठा दावा पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांचं सरकार आणखी अडीच वर्ष महाराष्ट्रात राहिलं असतं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 100 आमदार निवडून आले असते. हे मी खात्रीने सांगतोय,’ असं राजकीय विधान बावनकुळेंनी केलं.
‘राज्यपालांनीच भूमिका स्पष्ट करावी’
भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे सुरू झालेल्या वादावर अद्यापही पडदा पडलेला नाही. विरोधकांकडून या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केलं जात असताना बावनकुळे म्हणाले, ‘राज्यपालांचा आतापर्यंतचा प्रवास पहिला तर छत्रपतींचा त्यांनी आदरच केला आहे. परंतु मनुष्यप्राणी बोलता बोलता काही गोष्टी चुकून बोलून जातो. त्याचं समर्थन कोणीच करणार नाही. कारवाई करण्याचा अधिकार आपल्याला नाही. पण राज्यपालांनी स्वतः याबाबत भूमिका स्पष्ट करावी या मताचे आम्ही आहोत’, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडलीये.
ADVERTISEMENT