मुंबई: मान्सून मुंबईत (Mumbai) पोहचला असून पहिल्याच पावसाने मुंबईला (Mumbai Rains) जोरदार दणका दिला आहे. मध्यरात्रीपासून कोसळणारा हा पाऊस आज (9 जून) दिवसभर बरसत आहे. यामुळे अवघ्या काही तासात संपूर्ण मुंबई जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, ही परिस्थिती निसर्गामुळे नाही तर आपल्यामुळेच निर्माण झाली आहे आणि ते आपल्याला सहन करावंच लागेल असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाड यांनी आजच्या पावसाविषयी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे जी खरं तर वास्तववादी आहे. पाहा जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले आहेत:
‘तुम्हाला समुद्रात भराव घालून केलेले रस्ते आणि पूल हवेत. मेट्रो हवीच आणि त्यासाठी केलेले खोदकाम हवे. झाडांची तोड झाली तरी चालते. गगनचुंबी इमारती हव्यात आणि मॉल्स हवेत. सुळकन धावतील अश्या गाड्यांसाठी मोठे रस्ते आणि ट्राफिक जॅम होऊ नये म्हणून पूल हवेत.’
‘संपत्तीचे केंद्रीकरण करून सारं काही मुंबई नामक एकाच शहरात कोंबण्याचा अट्टाहास तुमचाच. लोकसंख्या वाढली तरी त्याकडे डोळेझाक तुमचीच. अनिर्बंध बांधकाम विरोधी कोणी बोललं तर तुम्ही त्याला विकास विरोधी ते पाकिस्तानी एजंट ठरवायला मागे पुढे पाहात नाही.’
‘मग मित्रहो, तुंबली मुंबई तर चिडता कशाला? तुम्हाला जे हवंय ते मिळण्यासाठी हे सहन केलंच पाहिजे.’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Water Logging मुळे अंधेरी सब वे बंद, मुंबई ठिकठिकाणी पावसाच्या सरी
मुंबई या शहराची लोकांना सामावून घेण्याची क्षमता संपलेली असताना देशभरातून लोंढे मुंबईत आदळत आहेत. यामुळे येथील प्रत्येक गोष्टीवर त्याचा ताण जाणवू लागला आहे. त्यामुळेच पहिल्या पावसानंतर मुंबई जलमय झाल्याचं जे चित्र पाहायला मिळतं आहे त्याविषयी जितेंद्र आव्हाड हे एका वेगळ्या पद्धतीने व्यक्त झाले आहेत.
मुंबईत Red Alert जारी:
IMD ने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. पुढचे चार ते पाच दिवस असाच पाऊस कोसळणार आहे. त्या अनुषंगाने हा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला असून पुढचे चार ते पाच दिवस हे मुसळधार पावसाचे असणार आहेत हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
Monsoon 2021 : महाराष्ट्रासाठी पुढचे ५ दिवस धोक्याचे, IMD कडून अलर्ट जाहीर
आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे. अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चारही दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ADVERTISEMENT