अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या अमोल मिटकरी यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच मोठी नाचक्की झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोल्याचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडूनच मिटकरी यांच्यावर उघडपणे कमिशनखोरीचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांचा व्हिडीओ ‘मुंबई तक’च्या हाती लागला आहे.
ADVERTISEMENT
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. याच आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरींविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला आहे. दरम्यान मिटकरी यांच्याविरोधातील तक्रारी आणि आरोप सुरु असतानाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडीओ शुटींग बंद करण्याची सुचना केल्याचेही व्हिडीओमधून दिसून येत आहे.
“राज आणि आमचे वैचारिक साम्य” : भाजप मनसे युतीचे बावनकुळेंचे संकेत
अमोल मिटकरींवर काय आरोप झाले आहेत?
अकोला जिल्ह्यात लोक कंटाळलेले आहेत. लोकांना विकास पाहिजे आणि आपण तो विकास देवू शकत नाही. इथे सातत्याने भाजपचे आमदार निवडून येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आल्यावर लोकांमध्ये एक आशा निर्माण झाली होती.
पण अमोल दादांकडून जवळपास ५० कोटी निधीपैकी १६ कोटींचा निधी त्यांच्या गावात टाकला. मात्र त्यांच्या गावात ना ग्रामपंचायत निवडून आली ना सोसायटी आली. जिल्हा परिषदेला तर डिपॉझिटचं जप्त झाले होते. आम्ही काय करावे साहेब? मतदारसंघामध्ये काय सांगावं?
उद्धव ठाकरेंची टीम तयार? शिंदेंना घेरण्याचं नियोजन ठरलं…
त्याचवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी माईक हातात घेवून मिटकरी यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, आम्ही तर पैसे देवून निधी मागत होतो पण त्यांनी निधी दिला नाही. जिल्हाध्यक्षांकडून तर दोन लाख रुपये घेवून त्यांना २० लाखांचा निधी दिला, असाही आरोप मिटकरी यांच्यावर होताना दिसत आहे. दरम्यान याबाबत ‘मुंबई तक’ने अमोल मिटकरी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
ADVERTISEMENT