पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर वातावरण तापलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि इतर राजकीय हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्ट्राच्या विविध भागात आंदोलन केलं जातं आहेत. तसंच आता राज्यपाल हटाव ही मोहिम सुरु करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
याच आंदोलनाचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक येथील समाधीस्थळी आत्मक्लेश आंदोलन केलं. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अशोक बापू पवार, अमोल मिटक, प्राजक्त तनपुरे, संदीप क्षीरसागर, नितीन पवार यांनीही उपस्थिती लावली होती. सोबत इतरही अनेक स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते.
डॉ. अमोल कोल्हे अनुपस्थित :
मात्र या सर्वांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अनुपस्थितीची बरीच चर्चा रंगली. मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हे भाजपच्या जवळ जात असल्याच्या चर्चा सुरु असल्याने त्यांच्या अनुपस्थितीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर आता स्वतः अमोल कोल्हे यांनी भाजप नेत्यासोबतचा फोटो ट्विट करुन आपण आंदोलनाला का उपस्थित नव्हतो याचं कारण सांगितलं आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, काल वढू तुळापूर येथे करण्यात आलेल्या आत्मक्लेश आंदोलनाची मला पूर्वकल्पना नसल्यामुळे मी उपस्थित नव्हतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचावा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित “शिवपुत्र संभाजी” महानाट्यासंदर्भात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांची भेट घेऊन चर्चा केली, अशी माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
रोहित पवारांवर काय म्हणाले अमोल कोल्हे?
यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी आमदार रोहित पवार यांनाही खोचक टोलाही लगावला. ते म्हणाले, मतदारसंघातील “आत्मक्लेश” साठी अनुपस्थित असल्याने उगाच चर्चा करण्याची गरज नाही, कारण शिवसिंहाच्या छाव्याने ‘आत्मक्लेश’ वगैरे बाबींपेक्षा झेपावण्याला आणि ठसा उमटवण्यालाचं महत्व दिलं असतं. त्याच आदर्शांवर चालण्याचा माझा प्रयत्न आहे, असं म्हणतं रोहित पवार यांच्या आंदोलनाबाबत नकारात्मक भूमिका मांडली.
ADVERTISEMENT