खासदार अमोल कोल्हेंनी दिलेला शब्द पाळला! बैलगाडा शर्यतीत घोडीवर झाले स्वार

मुंबई तक

• 10:07 AM • 16 Feb 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द आज पाळला आहे. अमोल कोल्हे हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर स्वार झालेले पाहण्यास मिळाले. यासंदर्भातला शब्द त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिला होता. जे वचन त्यांनी दिलं होतं ते त्यांनी पाळलं आहे. पुण्यातील निमगाव दावडी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अमोल […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द आज पाळला आहे. अमोल कोल्हे हे आज बैलगाडा शर्यतीत घोडीवर स्वार झालेले पाहण्यास मिळाले. यासंदर्भातला शब्द त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिला होता. जे वचन त्यांनी दिलं होतं ते त्यांनी पाळलं आहे. पुण्यातील निमगाव दावडी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अमोल कोल्हे हे घोडीवर स्वार झाले होते.

हे वाचलं का?

निमगाव दावडी हा खंडोबाच्या मानाचा घाट आहे. बैलगाडा मालकांनी या घाटात सर्जा राजाच्या जोड्या उतरवल्या होत्या. याच बैलगाडा शर्यतीत अमोल कोल्हे घोडीवर स्वार झालेले पाहण्यास मिळाले. त्यांनी एक रपेटही मारली आणि उपस्थितांची मनं जिंकली.

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी याच मुद्द्यावरून अमोल कोल्हे यांना 11 फेब्रुवारीला विचारणा केली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आढळरावांनी त्यांच्या गावातील घाटात येण्याचं आमंत्रण कोल्हे यांना दिले होते. आढळराव पाटील यांनी कोल्हेंना खुलं आव्हान दिलं होतं. बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते.

अमोल कोल्हेंच्या आश्वासनावरून आढळराव पाटलांनी त्यांना अनेकदा घाट दाखवला. पुढे देखील ते अनेकदा कोल्हेंना या मुद्यावरुन कोंडीत पकडू शकतात, हे लक्षात आल्यानं पहिल्या बारीत नाही तर नाही निदान मानाच्या घाटात तरी घोडीवर बसण्यासाठी कोल्हे आज तयार झाले. अमोल कोल्हेंची बारी पाहायला बैलगाडा शौकिनांना देखील उत्सुकता लागलेली होती. अखेर ती शौकिनांची इच्छा कोल्हेंनी पूर्ण केली आहे.

निमगावातील असंख्य लोकं बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जमले होते. या शर्यतीचं प्रमुख आकर्षण हे डॉ. अमोल कोल्हे होते. लोकांना हात दाखवून, साद घालत अमोल कोल्हे यांनी फोटोसेशनही केलं. अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी आपला दिलेला शब्द पूर्ण केलाय. मांड टाकून घोडीवर स्वार होत अमोल कोल्हे यांनी रपेट मारली.

    follow whatsapp