भारतरत्न लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे निधन झालं. मुंबईतल्या ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. लतादीदींच्या पार्थिवावर मुंबईतल्या दादर या ठिकाणी असलेल्या शिवाजी पार्क मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमींची गर्दी लोटली होती. यावेळी शरद पवारांचीही उपस्थिती होती.
ADVERTISEMENT
उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. अंत्यदर्शनावेळचा त्यांचा एक फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण बाप आणि लेकीच्या नात्याचं कौतुक करत आहेत. बाप आणि लेकीचा हा जिव्हाळा अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रूही आणतो आहे.
लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. यावेळी ते बूट घालण्यासाठी खाली वाकणार होते. वडिलांना खाली वाकून बूट घालण्यास त्रास होईल म्हणून सुप्रिया सुळे पुढे सरसावल्या आणि त्यांनी खाली बसून वडिलांच्या पायात बूट घातले. हाच क्षण कॅमेरात टीपला गेला आणि तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवली त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयातील आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. मात्र शनिवारी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यावेळी सगळ्यांनाच काळजी वाटली होती. त्यानंतर रविवारी सकाळी म्हणजेच 6 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकर यांचं निधन झालं. मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती डॉ. प्रतित समदानी यांनी दिली.
आशा भोसलेंनी शेअर केला लतादीदींसोबतचा लहानपणीचा फोटो, आठवणींना दिला उजाळा
ब्रीचकॅन्डी रुग्णालयातून रविवारी दुपारी त्यांचे पार्थिव पेडर रोड येथील प्रभूकुंज निवासस्थानी आणण्यात आले. चित्रपटसृष्टीतील तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी प्रभूकंज येथे लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. पेडर रोड येथून दुपारी चारच्या सुमारास लता मंगेशकर यांची अंत्ययात्रा शिवाजी पार्कच्या दिशेने निघाली. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अंत्ययात्रा शिवाजी पार्क मैदानात पोहोचली. त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अंत्ययात्रा शिवाजी पार्क मैदानात पोहोचल्यानंतर लता मंगेशकर यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
ADVERTISEMENT