पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षेबाबत आता एक अत्यंत मोठी अपडेट समोर आली आहे. एमपीएससी परीक्षेबाबत काल जो गोंधळ झाला होता त्यानंतर आयोगाने आज (12 मार्च) एक पत्रक काढून थेट परीक्षेची तारीखच जाहीर केली आहे. अधिकृत पत्रकानुसार संबंधित परीक्षा ही रविवार, 21 मार्च 2021 रोजी म्हणजे पुढच्याच आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाने झाला होता गदारोळ
MPSC ची राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर काल (11 मार्च) पुढे ढकलण्यात आल्याचं घोषित करण्यात आलं होतं. राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्चला होणार होती पण अवघे तीन दिवस राहिलेले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं घोषित करण्यात आलं होतं.
या निर्णयामुळे पुण्यात संतप्त विद्यार्थी हे रस्त्यावर उतरले होते. याआधी ही परीक्षा दोनवेळा कोरोना संकटामुळेच पुढे ढकलण्यात आली होती.
केंद्र सरकारने आयोजित केलेल्या परीक्षा व्यवस्थित झाल्या मग ठाकरे सरकारच परीक्षा पुढे का ढकलतं आहे? असा प्रश्न यावेळी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला होता.
MPSC च्या निर्णयामुळे राज्यातले विद्यार्थी सरकारविरोधात आक्रमक
MPSC बाबतचा निर्णय हा मला अंधारात ठेवून घेतला: विजय वडेट्टीवार
MPSC ची १४ मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने ठाकरे सरकारविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले होते. या निर्णयाचा फेरविचार केला जावा अशी मागणी सर्वच पक्षातून देखील होऊ लागली होती.
यावेळी भाजपच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांसोबत थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. दरम्यान, याचवेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी MPSC बाबतचा निर्णय हा मला अंधारात ठेवून घेतला गेल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात प्रशासकीय पातळीवर बराच गोंधळ असल्याचं समोर आलं होतं.
MPSC बाबतचा निर्णय मला अंधारात ठेवून घेण्यात आला-वडेट्टीवार
मुख्यमंत्र्यांनी MPSC च्या विद्यार्थ्यांना काय सांगितलं होतं?
दरम्यान, या सगळ्या गोंधळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (11 मार्च) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एमपीएसचीच्या विद्यार्थ्यांना संबोधित केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री असं म्हणाले होते की, ‘दिवाळी असताना MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळीच आश्वासन दिलं होतं की यानंतर जी तारीख जाहीर होईल त्यात बदल होणार नाही असं मी सांगितलं होतं. मात्र MPSC ची परीक्षा पुढे ढकलली आहे ती काही महिन्यांसाठी नाही तर काही दिवसांसाठी आहे.’
‘उद्या यासंदर्भातली तारीख जाहीर होईल ती पुढच्या आठ दिवसांमधलीच असेल.’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं होतं.
‘विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास करावा, कुणी भडकवतं म्हणून भडकू नये. कोरोनाचा राक्षस डोकं वर काढतो आहे, त्याच्याशी आपल्याला लढा द्यायचा आहेच. मात्र विद्यार्थ्यांनी हा प्रश्न संयमाने घ्यावा.’ अशी विनंती देखील उद्धव ठाकरे यांनी केली होती.
ADVERTISEMENT