अँटेलिया बाहेर स्कॉर्पिओ कार सचिन वाझेंनीच ठेवली?, NIAला संशय

मुंबई तक

• 11:08 AM • 16 Mar 2021

मुंबई: सचिन वाझे प्रकरणात आत्तापर्यंत अनेक घडामोडी घडल्या असून या प्रकरणात NIA, Crime branch, ATS या यंत्रणा तपास करत आहेत. सध्या वाझेंना 25 मार्चपर्यंत NIA ची कस्टडी मिळाली असून या प्रकरणाबद्दल जी काही माहिती आतापर्यंत हाती आली आहे ते पाहता संशयाची सुई ही सचिन वाझे यांच्याकडेच वळत आहेत. यामुळे अँटेलियाबाहेर जी स्कॉर्पिओ कार ठेवण्यात आली […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: सचिन वाझे प्रकरणात आत्तापर्यंत अनेक घडामोडी घडल्या असून या प्रकरणात NIA, Crime branch, ATS या यंत्रणा तपास करत आहेत. सध्या वाझेंना 25 मार्चपर्यंत NIA ची कस्टडी मिळाली असून या प्रकरणाबद्दल जी काही माहिती आतापर्यंत हाती आली आहे ते पाहता संशयाची सुई ही सचिन वाझे यांच्याकडेच वळत आहेत.

हे वाचलं का?

यामुळे अँटेलियाबाहेर जी स्कॉर्पिओ कार ठेवण्यात आली होती ती खुद्द वाझेंनीच ठेवलेली का? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

वाझेंना NIA ने अटक का केली?

अँटेलिया बाहेर सापडलेली स्कॉर्पिओ, त्यातील जिलेटिनच्या कांड्या यामुळे या साऱ्या प्रकरणात NIA या केंद्रीय तपास यंत्रणेचा प्रवेश झाला. NIA ने जेव्हा या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरु केली तेव्हा या प्रकरणाचे तपास अधिकारी सचिन वाझे हे होते. त्यामुळे NIA ने सचिन वाझेंकडून यासंबंधी माहिती घेण्यासाठी बोलावले होते. पण वाझे चौकशीला आले तेव्हा त्यांचा फोन घेऊन आले नव्हते. संशयित म्हणून वाझेंना चौकशीसाठी बोलावण्यात आलं नव्हतं.

वाझे या प्रकरणाचा तपास सुरुवातीपासून करत होते. पण चौकशीदरम्यान वाझे सहकार्य करत नव्हते. वाझेंनी आपल्या कुटुंबीयांचा फोन नंबर देखील दिला नाही. म्हणून त्यांच्या अटकेविषयी त्यांच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आणि वाझेंना अटक करण्यात आली. माहिती घेण्यासाठी बोलवले असताना फोन न घेऊन जाणं आणि कुटुंबीयांचा नंबर न देणं या घटनांमुळे सचिन वाझेंवरचा संशय अधिक बळावला.

वाझेंच्या सोसायटीचं CCTV फुटेज का आहे चर्चेत, नेमका घटनाक्रम काय?

सचिन वाझेंचे निलंबन

एनआयएने अँटेलिया संशयित कारप्रकरणी सचिन वाझे यांना अटक केली. त्याच अटकेनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. NIA च्या अटकेनंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि सचिन वाझे या प्रकरणात सहभागी आहेत का यासंबंधातले गूढ वाढले.

पांढऱ्या इनोव्हा गाडीचे गूढ?

अँटेलिया बाहेर जी संशयास्पद स्कॉर्पिओ सापडली होती त्याच स्कॉर्पिओमागे एक इनोव्हा गाडी अँटिलिया बाहेर दिसली होती. ही इनोव्हा गाडी नेमकी कोणाची हा प्रश्न होता. हे गूढ उकलल्याचा दावा NIA कडून केला जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने काही सीसीटीव्ही फुटेज जमा केली आहेत. यात सर्वात महत्वाचं फुटेज हे त्या संशयित इनोव्हा कारचे आहे.

पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणारी इनोव्हा कार आणि अँटेलियाबाहेर दिसलेली इनोव्हा कार या एकच असल्याचं NIA चे म्हणणं आहे. सचिन वाझे ज्या CIU मध्ये कार्यरत होते. त्या शाखेमध्ये ही इनोव्हा कार वापरली जात होती. NIAने केलेल्या तपासात २४ फेब्रुवारीचे सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा धागा ठरला आहे.

पोलीस मुख्यालयातून २४ तारखेला ही इनोव्हा कार बाहेर पडली. नंतर ही इनोव्हा ठाण्याच्या दिशेने गेली. ज्यामुळे API सचिन वाझे यांच्याभोवती सगळी तपासाची चक्र फिरू लागली आहेत.

वाझेंच्या सोसायटी CCTVबाबत मोठा खुलासा, ‘मुंबई तक’च्या हाती पत्र

अँटेलियाबाहेर दिसलेल्या इनोव्हाबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी!

1. २५ तारखेला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया येथे स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं आढळली

2. २५ फेब्रुवारीला मुलुंडच्या टोल नाक्यावरून कटात सहभागी झालेली स्कॉर्पिओ पास झाली. त्यानंतर काहीवेळातच इनोव्हासुद्धा तिथून गेली.

3. पोलिसांनी स्कॉर्पिओ जप्त केली होती. मात्र इनोव्हा कार मिळत नव्हती. वाझेंना १३ तारखेला मध्यरात्री अटक केल्यानंतर NIA ने ही संशयित इनोव्हा कारसुद्धा जप्त केली.

अँटिलिया बाहेरची स्कॉर्पिओ वाझेंच्या सोसायटीमध्ये?

अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ ही मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. 17 फेब्रुवारीला मनसुख यांची गाडी चोरीला गेली आणि 25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर सापडली.

तेव्हा मधल्या काळात 17 ते 25 फेब्रुवारीमध्ये ही गाडी सचिन वाझेंच्या ताब्यात असावी असा NIA ला संशय आहे. CIU युनिटचे रियाझ काझी यांनी वाझे यांच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज मागितल्याचे पत्र NIA ला मिळाले आहे.

25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओ सापडल्यानंतर दोनच दिवसांनी रियाझ काझी यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी सोसायटीकडे केली. सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत काॅम्पलेक्स इमारतीतील CCTV फुटेज डीव्हीआरसहित घेऊन गेले होते आणि धक्कादायक म्हणजे सचिन वाझे यांची CIU च्या टीमनेच हे CCTV फुटेज नेलं होतं. त्यामुळे आता हा प्रश्न उपस्थित होते की सचिन वाझे राहत असलेल्या इमारतीचे CCTV फुटेज CIU च्या अधिकाऱ्यांनी का नेलं असावं?

स्कॉर्पिओ गाडी ही वाझेंच्या सोसायटीमध्ये होती आणि त्याचा पुरावा कोणाला मिळू नये म्हणून वाझेंनीची पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

PPE कीटमधील व्यक्ती नेमकी कोण?

अंबानींच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ उभी होती त्यातून एक व्यक्ती PPE कीट घालून गाडीतून उतरताना दिसत आहे. त्यानुसार आता एनआयएकडून सचिन वाझेंना पीपीई कीट घालून पुन्हा एकदा मॉक ड्रील केले जाणार आहे अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत देखील अशी माहिती दिली होती की, मनसुख हिरानी यांची स्कॉर्पिओ ही सचिन वाझेंकडेच होती. तसंच मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सुध्दा दाखल केलेल्या तक्रारीमध्ये देखील हाच आरोप करण्यात आला होता.

मात्र, असं असलं तरीही हे या प्रकरणातील अद्याप कच्चे दुवे आहेत. ज्यामुळे सचिन वाझे यांच्या भोवतालचे संशयाचे धुके गडद होत आहे.

    follow whatsapp