Night curfew : राज्यात पुन्हा रात्रीची संचारबंदी?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मुंबई तक

• 03:19 PM • 29 Aug 2021

राज्यात पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी लागू होण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत आज दिले. केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्री घेतील, असं टोपे म्हणाले. केरळमध्ये ओनम सणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केरळात रुग्णसंख्येत विस्फोटक वाढ झाली असून, केंद्र सरकारने आगामी दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या […]

Mumbaitak
follow google news

राज्यात पुन्हा एकदा रात्रीची संचारबंदी लागू होण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत आज दिले. केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र मुख्यमंत्री घेतील, असं टोपे म्हणाले.

हे वाचलं का?

केरळमध्ये ओनम सणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केरळात रुग्णसंख्येत विस्फोटक वाढ झाली असून, केंद्र सरकारने आगामी दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्राकडून काही उपाययोजनाही सूचवण्यात आलेल्या आहेत.

केंद्राकडून स्थानिक पातळीवरील निर्बंध तसेच रात्रीची संचारबंदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी टोपे यांनी रात्रीच्या संचारबंदीचे संकेत दिले.

‘केरळमध्ये ओनमनंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्राने राज्य सरकारला रात्रीच्या संचाबंदीची सूचना केली आहे. आगामी काळातील राज्यातील सण उत्सव पाहता याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी होईल. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असं राजेश टोपे म्हणाले.

‘ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत, तिथे शाळा सुरू होऊ शकतात का? याची चाचपणी करत आहोत. ५ तारखेपर्यंत सर्व शिक्षक आणि सबंधित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी विशेष अभियान राबवलं जाईल’, अशी माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी काय म्हटलेलं आहे?

मागील दोन महिन्यात नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत असलं, तरी राज्यात आगामी काळात दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी होणारी ही संभाव्य गर्दी लक्षात घेता राज्य सरकार स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करु शकते, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलेलं आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरने आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अर्थात केंद्रीय रोग नियंत्रण प्रतिबंध केंद्राने सुपर स्प्रेडर कार्यक्रमांबद्दल अगोदरच चिंता व्यक्त केलेली आहे. उत्सवांच्या काळात होणारी अशा प्रकारची गर्दी सुपर स्प्रेडर ठरू शकते आणि रुग्णसंख्या वाढू शकते, असं या दोन्ही संस्थांनी म्हटलेलं आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रात म्हटलेलं होतं.

दरम्यान, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना नाईट कर्फ्यू लागू करण्याची सूचना केली होती. दोन्ही राज्यांतील ज्या भागांमध्ये कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण जास्त आहे, अशा भागात राज्य सरकारने नाईट कर्फ्यू लागू करावा, अशी सूचना केंद्रीय गृह सचिवांनी केलेली आहे. तसं पत्रच राज्यांना पाठवले आहे.

    follow whatsapp