Nipah Virus : निपाह व्हायरसनं वाढवली चिंता; केरळमध्ये 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मुंबई तक

• 05:59 AM • 05 Sep 2021

कोरोनाचा उद्रेक झालेला असतानाच केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निपाह व्हायरसने चिंता वाढवली असून, केरळातील कोझिकोडमध्ये एका 12 वर्षीय मुलाचा निपाहचा संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. ओनम सणानंतर केरळात कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण सध्या केरळात आढळत असून, त्यातच आता निपाह […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाचा उद्रेक झालेला असतानाच केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निपाह व्हायरसने चिंता वाढवली असून, केरळातील कोझिकोडमध्ये एका 12 वर्षीय मुलाचा निपाहचा संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला.

हे वाचलं का?

ओनम सणानंतर केरळात कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण सध्या केरळात आढळत असून, त्यातच आता निपाह व्हायरसचा संसर्ग होऊन एका मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यातील ‘एनआयव्ही’ने (नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट) या मुलाला निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट केलं होतं. केरळमधून आलेल्या नमुने निपाह पॉझिटिव्ह आले असल्याचं प्रयोगशाळेनं म्हटलं आहे. या मुलाला कोझिकोडे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मुलाची प्रकृती गंभीर झाली होती. सुरूवातीला मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना रविवारी सकाळी या मुलाचा मृत्यू झाला.

निपाह विषाणू बाधित रुग्ण आढळल्याने मंत्र्यांसह अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली होती. या बैठकीत एक समिती गठीत करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, निपाह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचं काम व इतर उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मागील १२ दिवसात संपर्कात आलेल्या नागरिकांचं ट्रेसिंग केलं जात आहे. त्याचबरोबर क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ही घटना समोर आल्यानंतर केंद्र सरकारने एक पथक केरळला पाठवलं आहे. हे पथक आज केरळमध्ये दाखल होणार आहे. हे पथक राज्य सरकारला मदत करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

कोझिकोडमध्ये 19 मे 2018 साली पहिल्यांदा निपाहचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर केरळमध्ये निपाह विषाणूमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, प्रकाशाची भीती वाटणे ही या आजाराची लक्षणं आहेत.

    follow whatsapp