‘मला माजी मंत्री म्हणून दोन दिवसात कळेल’, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटल्यानंतर सगळ्याचं लक्ष दोन दिवसांत काय होणार याकडं लागलं. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांच्या भविष्यातील सहकारी असा उल्लेख केल्यानं युतीच्या चर्चेला तोंड फुटलं. या सगळ्या चर्चेवर नितेश राणे यांनी आज ट्वीट करुन वेगळाच मुद्दा अधोरेखित केला आहे.
ADVERTISEMENT
भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून जुन्या मित्र पक्षाबद्दल व नेत्यांबद्दल करण्यात आलेल्या विधानांनी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर सर्वसामान्यांना संभ्रमात टाकलं आहे. भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचे वेगवेगळे अर्थ राजकीय अभ्यासकांनी लावले जात असतानाच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केलं आहे.
भाजप-शिवसेना युतीबद्दल होत असलेल्या चर्चेच्या गोंधळात ट्वीट करत नितेश राणे यांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे.
नितेश राणे काय म्हणाले?
‘शिवसेना-भाजप युतीबद्दलचं विधान फक्त बीकेसीतील एमएमआरडीए पूल कोसळल्याच्या घटनेवरुन माध्यमांच लक्ष हटवण्यासाठी करण्यात आलं होतं का? असंच वाटतंय’, असं म्हणत नितेश राणे यांनी वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील पूल दुर्घटनेकडे सर्वांच लक्ष वेधलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद इमारतीच्या अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याकडे हातवारे करत ‘आज मंचावर उपस्थित आजी-माजी आणि एकत्रित आले, तर भावी सहकारी’, असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
युतीची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही…
युतीबद्दल चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा युती होणार, सरकार पडणार अशा चर्चांनी डोकं वर काढलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरही अशाच चर्चा काही दिवस रंगल्या होत्या.
उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रावरूनही मोठी खळबळ उडाली होती. मोदीशी जुळवून घ्या. भाजपशी युती करा अशा आशयाचं पत्र सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलं होतं. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून होत असलेल्या चौकशांच्या पार्श्वभूमीवर हे पत्र दिलं गेलं होतं. या पत्रानंतरही शिवसेना काय भूमिका घेणार याबद्दल चर्चा झाली होती.
ADVERTISEMENT