२०२४ मधील लोकसभा निवडणुकीला अवकाश असला तरी राजकीय पक्षांनी जोरात तयारी सुरू केलीये. बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री तथा जदयूचे नेते नितीश कुमार यांनी थेट भाजपलाच आव्हान देण्यास सुरूवात केलीये. विरोधकांची एकजूट बांधण्यात व्यस्त असलेल्या नितीश कुमारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पहिली चाल चालल्याची चर्चा सुरू झालीये.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणूक २०२४ अजून दीड वर्षांचा वेळ आहे. असं असलं तरी राजकीय पक्षांनी अजेंडा समोर ठेवत काम सुरू केलंय. भाजप आणि एनडीएतून दूर झालेल्या नितीश कुमार यांनी विरोधकांची मोट बांधण्यास सुरूवात केलीये. यातच आता नितीश कुमार यांनी मागासलेल्या राज्यांसाठी मोठी घोषणा केलीये.
केंद्रात बिगर भाजपचं सरकार आल्यास आपण देशातील सर्व विकासाच्या बाबतीत मागासलेल्या राज्यांना विशेष दर्जा देऊ, असं नितीश कुमार यांनी म्हटलंय. नितीश कुमार यांच्या याच घोषणेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीश कुमारांची ही पहिली चाल असल्याचं बघितलं जातंय.
Lok Sabha Election 2024 : नितीश कुमार नक्की काय म्हणाले?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ‘२०२४ मध्ये जर केंद्रात आम्हाला सरकार स्थापनेची संधी मिळाली, तर आम्ही निश्चितपणे मागासलेल्या राज्यांना विशेष दर्जा देऊ. मी फक्त हे बिहारबद्दल बोलत नाहीये, तर इतर राज्यांबद्दलही बोलतोय. ज्यांना विशेष दर्जा मिळायला हवा. आमची पार्टी नेहमीच बिहारला विशेष दर्जा देण्यात यावा, याची मागणी करत आलीये’, असं मत त्यांनी मांडलं.
नितीश कुमार नरेंद्र मोदींची कोंडी करणार?
याच पत्रकार परिषदेत नितीश कुमार म्हणाले की, ‘जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पाटण्याला आले होते. तेव्हा आपण त्यांच्याकडे बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी केली होती. पण, पंतप्रधान मोदींनी असं केलं नाही. बिहारला दर्जा दिला गेला असता, तर राज्याचा विकास झाला असता’, असं नितीश कुमार म्हणाले.
नितीश कुमार यांचं हे विधान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं आहे. नितीश कुमार यांच मुद्द्यावरून नरेंद्र मोदींना कोंडीत पकडू शकतात. लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा बिहारच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर विकासाच्या बाबती मागासलेल्या राज्यांनाही आपल्या बाजून करण्याचा प्रयत्न नितीश कुमारांकडून होऊ शकतो, असेच संकेत मिळताहेत.
राज्यांना विशेष दर्जा : नितीश कुमारांकडून एका बाणात अनेक शिकारी?
नितीश कुमारांनी मागासलेल्या राज्यांना विशेष दर्जा देण्याच्या घोषणेकडे एका बाणात अनेक पक्षी मारल्याचं म्हणून बघितलं जातंय. नितीश कुमारांनी बिहारबरोबरच एनडीएत नसलेले मात्र, भाजपच्या बाजून झुकलेल्या पक्षांनाही संदेश दिलाय.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी सातत्यानं राज्यांना विशेष दर्जा देण्याची मागणी केलीये. बिहार, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि गोवा या राज्यातील सरकारांकडून सातत्यानं केंद्राकडे विशेष दर्जाची मागणी केलीये जातेय.
हा मुद्दा नवीन पटनायक यांच्यापासून ते जगन मोहन रेड्डी यांच्यापर्यंत अनेकांनी अनेकवेळा पंतप्रधानांकडे मांडला आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विशेष दर्जाच्या मुद्द्यावरूनच भाजपची साथ सोडली होती. त्यामुळे नितीश कुमार यांनी केलेली घोषणा मोदींविरोधात पहिला डाव टाकल्याचं बघितलं जात आहे.
ADVERTISEMENT