प्रविण ठाकरे, नाशिक
ADVERTISEMENT
‘मराठा समाजाने आता कितीही इशारे दिले अथवा मोर्चे काढले तरी आरक्षण मिळणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तबच करुन टाकलेलं आहे. अशावेळी मराठा तरुणांनी नेत्यांच्या नादी लागू नये.’ अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोधातील याचिकाकर्ते अॅड गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांनी दिली आहे. ते नाशिकमध्ये (Nashik) पत्रकारांशी बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण पुन्हा मिळवून द्यावं यासाठी मराठा समाजाकडून सातत्याने मागणी केली जात आहे. यासाठी आता मराठा समाजाकडून (Maratha Community) इशारा देखील दिला जात आहे.
अशावेळी अॅड. सदावर्ते यांना याचबाबत जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते असं म्हणाले की, ‘मराठा आरक्षण हा काही आता चर्चेचाच विषय नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करुन टाकलं आहे.’
‘मराठा समाजाच्या नेत्यांनी मुस्लिम नेत्यांकडून काहीतरी शिकावं’
‘मराठा आरक्षण हे असंविधानिक ठरवलेलं आरक्षण आहे. त्यामुळे आता तो काही विषयच नाही. आता मी मराठा युवकांना सांगेल की, तुम्ही या राजकीय लोकांच्या नादी लागू नका, ते आता न मिळणारं आरक्षण आहे.’
‘मराठ्यांनी आपल्या देशातील मुस्लिम बांधवांकडून शिकलं पाहिजे. मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती खराब आहे. तरीही त्यांचे प्रमुख नेते एकत्र येऊन ठाकरे सरकारला सांगतात की, आम्हाला 5 टक्के आरक्षण नको. त्यांच्यापासून शिकण्याची वेळ आली आहे.’
‘मराठा कोअर ग्रुप नेत्यांना मी असं आव्हान करतो आहे की, तुम्ही अल्पसंख्यांक नेत्यांकडून काही तरी शिकलं पाहिजे.’ असं गुणरत्न सदावर्ते यावेळी म्हणाले.
‘मराठा आरक्षणाबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय’
‘देशाच्या हितासाठी ज्याच्याकडून ज्ञान मिळेल अशांपासून आपण शिकलं पाहिजे. त्यात अपमान मानून घेऊ नये. संविधानिक अर्थाने मी ते म्हणत आहे. मराठा समन्वयकांकडून इशारे देऊ देत अथवा मोर्चे काढू दे. आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने दिलेला निकाल आहे.’ असंही सदावर्ते यावेळी म्हणाले.
..म्हणून आमचा मराठा आरक्षणाला विरोध, गुणरत्न सदावर्तेंची भूमिका
‘अशा काही इशाऱ्याला महाराष्ट्र घाबरत नाही’
‘तुम्ही इशारे द्या, मोर्चे काढा आणखी जे-जे काही तुम्हाला लोकशाहीमधील करता येईल ते-ते करा, तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही. पण कोव्हिडचे बंधनं लक्षात ठेवा. त्यातील गुन्हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर तुमच्यामुळे लोकं आत्महत्या करत असतील तर त्याकडेही लक्ष द्या एका ब्राम्हण मुलाने आत्महत्या केली बुलडाण्यात. दुसरीकडे एका धनगर मुलाने आत्महत्या केली परीक्षा होत नाही म्हणून रत्नागिरीमध्ये. अशा आत्महत्या तुमच्यामुळे होणार नाही याची काळजी घ्या. आगामी काळात या थोतांड गोष्टी आहेत अशा काही इशाऱ्याला महाराष्ट्र घाबरत नाही.’ असं म्हणत सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT