बदलापुरात लॉकडाउनवरुन सावळागोंधळ, परस्परविरोधी विधानांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम

मुंबई तक

• 10:32 AM • 07 May 2021

बदलापूर शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात कडक लॉकडाउन लावण्यासंदर्भात दोन दिवसांपासून सावळा गोंधळ पहायला मिळतो आहे. गुरुवारी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत भाजपचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बदलापूरमध्ये मुरबाड पॅटर्न राबवत एक आठवड्याचा कठोर लॉकडाउन लावण्यासंदर्भात चर्चा झाली. ही बैठक झाल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी प्रसारमाध्यमांना याबद्दलची […]

Mumbaitak
follow google news

बदलापूर शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात कडक लॉकडाउन लावण्यासंदर्भात दोन दिवसांपासून सावळा गोंधळ पहायला मिळतो आहे. गुरुवारी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत भाजपचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बदलापूरमध्ये मुरबाड पॅटर्न राबवत एक आठवड्याचा कठोर लॉकडाउन लावण्यासंदर्भात चर्चा झाली. ही बैठक झाल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी प्रसारमाध्यमांना याबद्दलची माहिती दिली, ज्यामुळे बदलापूरात आठ दिवसांचा कडक लॉकडाउन लावण्यात येणार अशी माहिती पसरली.

हे वाचलं का?

सोशल मीडियावर आमदार कथोरे यांचा व्हिडीओ पसरल्यानंतर शहरात चर्चांना उधाण आलं. यानंतर शुक्रवारी सकाळी नागरिकांनी लॉकडाउन लागेल या भितीने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पायदळी तुडवले गेले. परंतू प्रत्यक्षात नगरपरिषदेने लॉकडाउन लावण्यासंदर्भात कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाहीये. मुख्याधिकारी दिपक पुजारी यांनी आमदार कथोरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लॉकडाउनचा प्रस्ताव पाठवला आहे. परंतू हा प्रस्ताव अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असून यावर कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाहीये.

त्यामुळे शहरात कोणत्याही प्रकारे नवीन लॉकडाउन लावण्यात येणार नसून सध्या राज्य शासनाच्या कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक पुजारी यांनी दिली. दरम्यान स्थानिक शिवसेना नेत्यांनी शहरात कोणताही नवा लॉकडाउन लागू करण्यात येणार नसून राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीचं कडक पालन व्हावं यासाठी प्रयत्न केले जातील असं जाहीर केलं आहे. परंतू दोन दिवसांमध्ये परस्परविरोधी विधानांमुळे बदलापूरकरांमध्ये चांगलंच संभ्रमाचं वातावरण पहायला मिळालं, ज्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    follow whatsapp