महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. यानंतर फडणवीस केंद्रात जाणार का यासंबंधी चर्चांना उधाण आलं होतं. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना फडणवीसांनी आपण दिल्लीला जाणार असल्याच्या शक्यता फेटाळून लावत महाविकास आघाडीतील आपल्या शुभचिंतकांना टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT
“आमच्या पक्षात आमचे नेते नरेंद्र मोदी जो आदेश देतील तो सर्वांसाठी शिरोधार्ह असतो. एक गोष्ट सांगतो की, ज्याला भाजपचं, महाराष्ट्राचं राजकारण कळतं त्याला हे कळून येईल की, मी महाराष्ट्रातून कुठेही जाण्याची ही वेळ नाही. माझ्या शुभचिंतकांना आनंद होतो की, मला दिल्लीत काही मिळेल. पण मी त्यांना सांगू इच्छितो की माझी दिल्लीत जाण्याची शक्यता नाही. काही लोकांना वाटतं की हा दिल्लीला गेला तर बला टळेल पण बला टळणार नाही, हे देखील मी स्पष्टपणे सांगतो”, असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाबद्दल जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत भाजप काहीही प्रतिक्रिया देणार नाही असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. पहिल्यांदा राज्य सरकारला निर्णय घेऊ द्या, त्यांचा निर्णय झाल्यानंतर आमची रणनिती तुमच्यासमोर येईल असंही फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT