कोव्हिड 19 प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये दिनांक 15 जून 2020 पासून प्रत्यक्ष वर्ग भरू नसल्याने राज्यातील शाळांमधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू केलं. शासनाने निर्णय घेतला आणि ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आलं. यु ट्यूब चॅनल, ऑनलाईन, अध्यापन वर्ग इत्यादीच्या मार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिलेत.
ADVERTISEMENT
बारावीची परीक्षा 23 एप्रिल 2021 पासून होणार होती. मात्र कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव वाढल्याने या परीक्षा रद्द करण्यात आल्याय विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. आता प्रश्न निर्माण झाला तो निकाल कसे लावणार याचा.बारावीचा निकाल तयार करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने निकष जाहीर केले आहे. CBSE मंडळाप्रमाणेच बारावीच्या निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी हेच सूत्र राज्य सरकारने वापरलं आहे.
कसं असणार मूल्यमापन?
दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण – 30 टक्के
अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण – 30 टक्के
बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या मूल्यमापन गुण- 40 टक्के असा फॉर्म्युला असणार आहे
प्रत्येक महाविद्यालयाकडून निकालासाठी मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यासह जास्तीत जास्त सात सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्यात येईल. निकालासंबंधित सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (दिव्यांग विद्यार्थ्यांसहित) ऑनलाईन , दूरध्वनीद्वारे एकास एक वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन करून नोंदी करून गुण देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
आणखी काय म्हटलं आहे सरकारने?
विद्यार्थ्याला दहावीत मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण विचारात घेतले जाणार आहेत. तर विद्यार्थ्याला 11 वीच्या अंतिम निकालामध्ये प्राप्त गेलेले गुणही गृहीत धरले जाणार आहेत. उच्च माध्यमिक शाळांना, कनिष्ठ महाविद्यालयांनी विषयनिहाय मंजूर आराखड्यानुसार वर्षभर ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने पहिली सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या वा तत्सम मूल्यमापन. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय मिळालेले गुण तसेच सदर गुण किती पैकी आहेत इत्यादीचा तपशील संगणक प्रणालीत भरण्याची सुविधा असेल. बारावीच्या लेखी परीक्षेत विषय निहाय निश्चित केलेल्या भारांशानुसार म्हणजेच 64/40/32/28/24/20 गुणांसाठी सदर गुणांचे संगण प्रणालीमधून रूपांतर होऊन सदरचे गुण विद्यार्थ्याला प्रदान केले जातील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT