मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओबाबत मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. गुरूवारी ही कार सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. आता या कारबद्दल पोलीस आयुक्तांनी दिलेली माहिती महत्त्वाची आहे.
ADVERTISEMENT
पाहा मुंबई तकचा खास व्हीडिओ
काय म्हणाले मुंबईचे पोलीस आयुक्त?
मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटेलियाबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ काळ्या रंगाची आहे. ही स्कॉर्पिओ कार बनावट नंबर प्लेटसह पार्क करण्यात आली होती. ही कार मुंबईतल्या विक्रोळी भागातून चोरण्यात आली. या कारचा चेसी नंबर मिटवण्यात आला आहे. त्यामुळे या कारचा मूळ मालक कोण हे शोधणं थोडं कठीण झालं आहे. मात्र पोलीस यासंबंधीचा तपास करत आहेत.
ही कार पेडर रोड भागात ज्या अज्ञाताने पार्क केली तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो आहे. मात्र हा अज्ञात व्यक्ती कोण हे देखील अद्याप समजू शकलेलं नाही. या अज्ञात माणसाने हुडी घातलं होतं आणि तोंडावर मास्क लावला होता त्यामुळे तो नेमका कोण हे कळू शकलेलं नाही.
या कारमध्ये जिलेटीनच्या ज्या कांड्या आढळल्या त्यांची फॉरेन्सिक टीमकडून अत्यंत बारकाईने तपासणी सुरू आहे. पोलिसांनी ज्या ठिकाणी कार पार्क करण्यात आली होती त्या ठिकाणचं वेगवेगळ्या अँगलचं सीसीटीव्ही फुटेज मिळवलं आहे. तसंच ही कार कुठून कुठे गेली त्याचंही सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. मुकेश अंबानी यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची धमकी किंवा तसा फोन आलेला नाही. या मागे कोणाचा हात असू शकतो असाही प्रश्न पोलीस आयुक्तांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी अद्याप तसं नाव समोर आलेलं नाही आमचा त्या अनुषंगाने तपास सुरू आहे असं उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT