Omicron Variant : ‘ओमिक्रॉन’मुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणार?; टोपेंनी दिली माहिती

मुंबई तक

• 07:51 AM • 28 Nov 2021

कोरोनाच्या दोन लाटांतून सावरलेल्या महाराष्ट्राची विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर येत आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नव्या व्हेरिएंटमुळे महाराष्ट्र सरकार सावध झालं असून, आता शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता दिसत आहे. शाळा सुरू करण्याबद्दल निर्णय झालेला असला, तरी या निर्णयाबद्दल पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णय […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या दोन लाटांतून सावरलेल्या महाराष्ट्राची विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर येत आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नव्या व्हेरिएंटमुळे महाराष्ट्र सरकार सावध झालं असून, आता शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता दिसत आहे. शाळा सुरू करण्याबद्दल निर्णय झालेला असला, तरी या निर्णयाबद्दल पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

राज्य सरकारने अलिकडेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते 4 थी, तर शहरी भागातील 1ली ते 7वीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. 1 डिसेंबरपासून हे वर्ग शाळेत भरणार होते. मात्र, मध्येच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. हा व्हेरिएंट धोकादायक असल्याचं सांगितलं जात असून, त्यामुळे सरकारनेही शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पुर्नविचार करण्याची भूमिका घेतली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना याबद्दल माहिती दिली. ‘नवीन व्हेरिएंट सापडल्याने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांना भारतात बंदी घालण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. कोरोनाचा नवा व्हेरिएंट लसीला निष्प्रभ करून वाढतो, हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे’, अशी माहिती टोपे यांनी दिली.

‘मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनीही दक्षिण आफ्रिकेवरून येणारी विमाने थांबविण्याची विनंती केली आहे. केंद्र सरकार काय निर्णय घेणार, याकडे आमचंही लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य विभागाने त्यास संमती दिली आहे. पण करोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे याबाबत पुन्हा एक बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक…

कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याचं समोर येताच सरकारने नव्याने निर्बंध लागू केले असून, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी 5:30 वाजता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री

कार्यालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

    follow whatsapp