मुंबई: रात्रीच्या वेळेस दुकानांचे शटर कसं धाडधाड खाली पडतात, तसं दोन वर्षांपूर्वी साऱ्या जगानं आपापली दारं लावून घेतली. शेअर मार्केट पडलं, अहोरात्र धावणारी आपल्या मुंबईसुद्धा या दुष्टचक्रात अडकली. यालाच लॉकडाऊन म्हटलं गेलं. अशातच आता ओमिक्रॉन नावाचं कोरोनाचं नवं रूप सापडलं आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? आताची परिस्थिती आधीपेक्षा वेगळी कशी आहे तेच जाणून घ्या सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
जवळपास दोन वर्षांपूर्वी कोरोना नावाच्या एका व्हायरसनं सार जग बंद करून दाखवलं. आता याच व्हायरसंच नवं रूप, नवा व्हेरिएंट सापडलाय. हे नवं रूप आधीच्या रूपापेक्षा अधिक वेगानं पसरतंय.
या व्हेरिएंटमुळे जगभरातली कोव्हिड रुग्णांची संख्या देखील वाढण्याचा मोठा धोका असल्याचं खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेचं म्हटलं आहे. काही भागात, देशात गंभीर संकट निर्माण होण्याची भीतीही WHO ने व्यक्त केली.
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ‘ओमिक्रॉन’मुळे जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जगभरातले प्रमुख शेअर बाजार अगदी पत्त्यासारखे कोसळत आहेत. 24 नोव्हेंबरला तिकडे अफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण रूग्ण आढला. तर इकडे भारतात 26 नोव्हेंबरला सेन्सेक्स दोन हजाराहून अधिक अंकांनी कोसळला. 2019 ला कोरोना आला तेव्हाही बाजार असाच गडगडला. काहीशी तीच दहशतीची फेज बाजारात आली आहे.
पुन्हा एकदा लॉकडाऊन लागेल, आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद होईल, देशोदेशीचे बंदीचे फतवे निघतील, या भीतीच्या सावटाखाली बाजारातले व्यवहार सुरू आहेत.
दोन वर्षांपूर्वी, एक गोष्टीची खूप चर्चा झाली. केंद्र सरकारनं जगभरातून येणाऱ्या प्रवाशांवर वेळीच बंदी घातली असती, तर हा परदेशी व्हायरस भारतात तेवढा पसरला नसता. तेव्हा आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाबद्दल निर्णय घेण्यास उशीर झाला.
याच धर्तीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून कोरोनाचं नवं रूप आढळलेल्या देशांतून येणारी विमानसेवा थांबवण्याची विनंती केली आहे. पण आधीची आणि आताची परिस्थिती दोन बाबतीत पूर्णतः वेगळी आहे.
1. दोन वर्षापूर्वी कोरोना व्हायरस अनोळखी होता. आता हा व्हायरस काय आहे, तो कसा पसरतो, काय करतो, किती जीवघेणा आहे हे जगाला नीट माहीत झालं आहे.
2. दुसरी गोष्ट म्हणजे औषधोपचार कसे करावेत, याची प्रक्रिया माहीत नव्हती. आता व्हायरसला रोखणारी लसही बाजारात आली आहे.
अनोळखी व्हायरस आणि औषधोपचारांचा अभाव या दोन प्रमुख गोष्टींमुळेच तेव्हा देशो-देशीच्या सरकारांनी लॉकडाऊन लावला. आता मात्र तशी परिस्थिती नाही. त्यामुळेच डॉ. फहिम युनूस यांच्यासारखे जगविख्यात डॉक्टर आताच्या घडीला प्रवासबंदी ही एक अपायकारक, वाईट आयडिया आहे, असं सांगतात.
त्यांच्या मते, प्रवासबंदीने कोरोनाचं संक्रमण रोखलं जातं जात नाही, हे आधीचं स्पष्ट, सिद्ध झालं आहे.
प्रवासबंदी लागू होईल तेव्हा आधीच व्हायरसचा संक्रमणाचा प्रवास पूर्ण झालेला असेल. प्रवासबंदीने चांगल्या, प्रामाणिक लोकांना शिक्षा होते आणि अशा प्रवासबंदीने नवा व्हेरिएंट शोधणाऱ्या देशांना नाऊमेद करतोय.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला लसीचं असमान वाटपं कारणीभूत असल्याचंही फहीम युनूस यांचं म्हणणं आहे. श्रीमंत देशांनी लसीचा मोठा साठा करून ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर गरीब देशांतल्या लसीकरणासाठी जगभरातून पुढाकार घेण्यात यावा, असं आवाहन खुद्द WHO चे प्रमुख डॉ. टेड्रोस घिब्रायसुस यांनी केलं आहे.
तिसऱ्या लाटेच्या तोंडावर लॉकडाऊनच्या सावटाखाली आलेल्या भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी लसीकरणाचा टक्का ही काहीशी दिलासादायक गोष्ट आहे. काही दिवसांतच भारत दीडशे कोटी डोस देणारा देश होईल. महाराष्ट्रही लसीकरणात नंबर वन आहे. पण काही राज्यांतलं लसीकरणाचं प्रमाण चिंताजनक आहे.
COVID 19 : लॉकडाऊन नको असेल, तर…; मुख्यमंत्री ठाकरेंनी अधिकाऱ्यांंना दिले महत्त्वाचे आदेश
त्यामुळेच सध्याच्या घडीला महाराष्ट्रात लॉकडाऊन लागेल, अशी शक्यता दिसत नाही आणि पुन्हा लॉकडाऊन कोणाला परवडणारही नाही. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन नको असेल, तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील, असं इशारावजा आवाहन केलं आहे. हीच आरोग्याची बंधनं आपण पाळायला हवी.
तुम्ही लस घेतली नसेल तर तात्काळ घ्या. दुसरा डोस राहिला असेल, तर तो पूर्ण करा.
ADVERTISEMENT