मोदी सरकारने जनतेला दिवाळी गिफ्ट दिलं आहे. पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे दिवाळीत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेले पाहण्यास मिळणार आहेत. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क 5 रूपये तर डिझेलवरचं उत्पादन शुल्क 10 रूपयांनी कमी करण्यात आलं आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे.
ADVERTISEMENT
डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात पेट्रोलच्या दुप्पट आहे. लॉकडाऊनच्या काळातही भारतीय शेतकऱ्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाने आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवला आहे आणि आगामी रब्बी हंगामात डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केल्याने शेतकऱ्यांना चालना मिळणार आहे.
अलिकडच्या काही महिन्यांमध्ये जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. परिणामी, अलिकडच्या आठवड्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या देशांतर्गत किंमतीमध्ये महागाईचा दबाव वाढला होता. जगाने सर्व प्रकारच्या ऊर्जेची कमतरता आणि वाढलेली किंमत देखील पाहिली आहे. देशात ऊर्जेचा तुटवडा भासणार नाही आणि पेट्रोल आणि डिझेल यासारख्या वस्तू आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले आहेत. त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क आकारते. जे संपूर्ण भारतात एकसमान आहे. मात्र यावर आकारले जाणारे व्हॅटचे दर राज्यानुसार भिन्न आहेत. राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर देशात सर्वाधिक व्हॅट आहे. राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. त्यामुळे केंद्राने राज्यांना देखील व्हॅट कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.
उत्पादन शुल्कातील कपातीबाबत अर्थ मंत्रालयाने सांगितले की, गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलने 100 रुपयांचा पल्ला गाठला आहे. काही शहरात तर पेट्रोलने 110 रुपयांची पातळी ओलांडली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईही वाढली आहे.
महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किंमती प्रति लिटर (3 नोव्हेंबर)
अहमदनगर- 116.06 रूपये
अमरावती- 116.96 रूपये
औरंगाबाद-117.37 रूपये
भंडारा-116.21 रूपये
चंद्रपूर- 116.65 रूपये
गडचिरोली-117.39 रूपये
मुंबई- 115.85 रूपये
नागपूर-115.65 रूपये
नांदेड-118.63 रूपये
परभणी-118.16 रूपये
यवतमाळ-117.18 रूपये
ठाणे-115.69 रूपये
ADVERTISEMENT