पुण्यात रानगव्यानंतर आता बिबट्याचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील हडपसर येथील सीरम इन्स्टिट्यूट कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या गोसावी वस्ती येथे मोकळ्या जागेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत व्यक्ती जखमी झाली असून, ससून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले.
ADVERTISEMENT
संभाजी बबन आटोळे असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी गणेश जगताप यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘आज सकाळी नेहमीप्रमाणे सहा वाजण्याच्या सुमारास संभाजी आटोळे हे मॉर्निग वॉकसाठी आले होते. मी माझ्या टेरेसवर असताना अचानक त्यांच्या अंगावर एका प्राण्याने झडप घातली आणि त्यांनी जोरजोरात आवाज दिला.’
‘संभाजी आटोळे यांनी आवाज दिल्यानंतर मी पाहिलं, तर साधारणपणे दीड फुट उंचीचा बिबट्या दिसला. त्यानंतर मी वस्तीवरील लोकांना आवाज देऊन गोळा केले. मात्र तोवर बिबट्या पळून गेला. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात संभाजी आटोळे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सुरुवातीला येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार,पुढे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’, असं ते म्हणाले.
वनविभागाचे अधिकारी म्हणतात…
‘आमच्या विभागाला सात वाजण्याच्या सुमारास फोन आला की, हडपसर येथील गोसावी वस्तीवर बिबट्याने वॉकला निघालेल्या व्यक्तीवर हल्ला केला आहे. त्यानंतर काही मिनिटांमध्ये आम्ही घटनास्थळी दाखल झालो. या ठिकाणावरील पाहणी केली असता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत असल्याने पायाचे ठसे आढळून आलेले नाहीत.’
‘प्रत्यक्षदर्शी ज्या प्राण्याचे वर्णन सांगत आहेत. त्यावरून नेमका कोणत्या प्राण्याने संबधित व्यक्तीवर हल्ला केला. हे सांगता येणार नाही. आम्ही प्राण्याचा शोध घेत आहोत. त्याच बरोबर या ठिकाणी रात्रीच्या वेळी गस्त घालणार आहे’, असं वन परिक्षेत्र अधिकारी एस. मुकेश जयसिंग यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT