विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांच्या अस्सल शैलीत त्यांनी नाव न घेता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला. आमच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात बेंबीच्या देठापासून शासनात विलनीकरण करा असं ओरडत होते. आझाद मैदानवर जाऊन झोपले होते. आता मात्र घरात गोधडीत झोपलेत, असा सनसनाटी टोला अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला.
ADVERTISEMENT
काय म्हणाले अजित पवार?
शनिवारी बीड येथील आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. चुन-चुनके मारेंगे, गिण-गिणके मारेंगे म्हणतात, गिणता तरी येत का? तुम्ही मारणार आणि बाकीच्यांनी काय बांगड्या भरल्यात का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. आमच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला त्यावेळी बेंबीच्या देठापासून ओरडत होते, सरकारी कर्मचारी करा, सरकारी कर्मचारी करा. आता काय झालं? तीन महिने झाले तुमच्या विचाराचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहे, सरकार तुमचं आहे. आता का गप्प झालात? कोणी अडवलं? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
‘आज घरात गोधडीत झोपलेत’- अजित पवार
वेगवेगळे नेते संपादरम्यान तिकडं आझाद मैदानावर झोपले होते. ते आज घरामध्ये गोधडीत झोपलेत. आता जावा ना, तुमच्या हातामध्ये संपूर्ण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत, अजित पवार म्हणाले. आम्ही सरकारमध्ये आले की वेगळ्या मागण्या करायच्या आणि हे सरकारमध्ये आले की सोईस्कररित्या विसरून जातात. ही दुटप्पी नीती लोकांनी ओळखली पाहिजे, असं पवार म्हणाले.
फुटाफुटीच्या राजकारणाला महाराष्ट्राने महत्व दिलं नाही
सध्याच्या राज्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना अजित पवार म्हणाले महाराष्ट्राने कधीच फुटाफुटीच्या राजकारणाला महत्व दिले नाही. 1992 साली शिवसेना फुटली होती नंतर देखील फुटली, परंतु फुटलेला एक देखील निवडून आला नाही. लोकांनी त्यांना बाजूला केलं. कारण विश्वासहर्ता त्यांनी गमावली, असा इतिहास अजित पवारांनी सांगितला. शिवाजी महाराजांचा फोटो लावून त्यांचा भगवा घेऊन मतं तुम्ही मागितली. अन असा काय चमत्कार घडला की, सुरतला जाऊन सगळंच बदललं? असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT