मनसुख हिरेन हत्ये प्रकरणी आज विधानसभेत पुन्हा एकदा गदारोळ पहायला मिळाला. राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली आहे. हिरेन यांच्या पत्नीने लिहीलेल्या पत्रातला मजकूर वाचून दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल चढवला.
ADVERTISEMENT
अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओ प्रकरणात NIA करणार तपास
सभागृहात काय म्हणाले फडणवीस?? जाणून घ्या…
या सभागृहामध्ये मनसुख हिरेन यांच्या मृत्यूसंदर्भातली बाब मी मांडली होती. माननीय मंत्रीमहोदयांनी यासंदर्भात सांगितलं यातला एक भाग NIA कडे गेला आहे आणि एक भाग ATS कडे तपासाला गेला आहे असं सांगितलं. पण मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी जो एफआयआर दाखल झाला आहे, त्याचसोबत त्यांच्या पत्नीने नोंदवलेला जवाबही महत्वाचा आहे. त्यातल्या दोन-तीन गोष्टीच मी तुम्हाला सांगणार आहे. आमच्या व्यवसायाच्या निमीत्ताने ग्राहक असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माझ्या पतीच्या ओळखीचे होते. त्यांना माझ्या पतीने सदर कार नोव्हेंबर २०२० मध्ये सदर कार वापरण्यासाठी दिली होती. सदरची कार त्यांनी ५-२-२१ रोजी त्यांनी त्यांच्या चालकामार्फत माझ्या पतीकडे आणून सोडली. म्हणजे ४ महिने ही गाडी सचिन वाझे यांच्याकडे होती.
मनसुख हिरेन प्रकरण : एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल
दिनांक २६-२-२१ रोजी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासोबत माझे पती गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेले. त्यानंतर साडेदहा वाजता ते सचिन वाझे यांच्यासोबत परत आले. दिवसभर ते सचिन वाझे यांच्यासोबत होते. २७ फेब्रुवारीला माझे पती पुन्हा एकदा सचिन वाझेंसोबत मुंबई गुन्हे शाखेत गेले, तिकडून रात्री साडेदहा वाजल्याच्या सुमारास ते घरी आले. यानंतर २८ फेब्रुवारीलाही माझे पती सचिन वाझेंसोबत बाहेर गेले, त्यांचा जवाब नोंद करण्यात आला. त्यांच्या जवाबाची कॉपी घरी आणून ठेवली. त्यावर सचिन वाझे यांचे नाव व सही आहे.
म्हणजेच दुसऱ्या कोणीही त्यांची चौकशी केलेली नाही. २ मार्च रोजी माझे पती दुकानातून घरी आले तेव्हा त्यांनी मला मी सचिन वाझेसोबत मुंबईला गेलो होतो असं सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरुन अॅड. गिरी यांच्याकडून पोलीस आणि रिपोर्टर यांच्याकडून वारंवार फोन करुन त्रास देत असल्याची तक्रार तयार करुन घेतली. मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना लिहीलेलं पत्र हे सचिन वाझे यांनीच तयार करुन दिलं होतं. सदर तक्रार अर्जाची प्रत मी सादर करत आहे. माझ्या पतीकडे पोलीसांनी मारहाण केली का, काही त्रास दिला का याबाबत मी चौकशी केली. ज्यावर त्यांनी कोणीही मारहाण केली नाही आणि त्रास दिला नाही असं सांगितलं. परंतू जबाव नोंदवून झाल्याचं काम संपल्यानंतरही वेगवेगळ्या पोलिसांकडून फोन येतात म्हणून तक्रार अर्ज दिल्याबद्दल त्यांनी सांगितलं. म्हणजे हा तक्रार अर्जही जो मीडियात आला तो सचिन वाझे यांनी तयार करुन दिला आहे.
३ मार्चला सकाळी माझे पती नेहमीप्रमाणे सकाळी दुकानात गेले व दुकान बंद करुन नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजल्याच्या सुमारास घरी आले. त्यावेळी रात्री माझे पती म्हणाले, सचिन वाझे बोलत आहेत की तू सदर केसमध्ये अटक हो. मी २-३ दिवसांमध्ये तुला जामिनावर काढतो. मी त्यावेळी पतीला सांगितलं की तुम्ही अटक होण्याची गरज नाही, आपण कोणाशी तरी सल्लामसलत करुन निर्णय घेऊ. यावेळी ते थोडे टेन्शनमध्ये वाटत होते. ४ मार्चरोजी सकाळी माझ्या पतींनी माझ्या मोबाईलवरुन माझे दीर विनोद हिरेन यांची पत्नी सुनीताला फोन करुन मला अटक होऊ शकते, तू चांगल्या वकीलाशी बोलून माझ्या अटकपूर्व जामिनासाठी बोलून ठेव असं सांगितलं आणि दुकानात निघून गेले. वकीलांशी चर्चा केल्यानंतर आपण गुन्हेगार नसल्यामुळे अटकपूर्व जामिनाची गरज नाही असं सांगितलं होतं.
माझ्या पतीचा खून झाला असावा अशी मला खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा असा मला संशय आहे. म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई होण्याची विनंती आहे.
यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी एका जुन्या गुन्ह्याचा दाखला दिला. “२०१७ ला एका खंडणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात दोघांनी अटकपूर्व जामीन घेतला होता, आणि यांची नावं आहेत धनंजय गावडे आणि सचिन वाझे…मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन हे धनंजय विठ्ठल गावडे याच्या ठिकाणी आहे. ४० किलोमीटर दूर बॉडी सापडते आहे. हिरेन यांना गावडेकडे जाण्याचं कारण काय आहे, काहीच नाहीये. याच्यापेक्षा अधिक पुरावे काय हवे आहेत? यानंतर फडणवीस यांनी सचिन वाझे यांना IPL 201 अंतर्गत अटक का झाली नाही असा सवालही फडणवीस यांनी सभागृहात विचारला.
३०२ सोडून द्या…ते कोणत्या पक्षात आहेत…गावडे कोणत्या पक्षात आहेत हे मी बोलणार नाही. हा राजकारणाचा विषय नाही. पण इतके पुुरावे असतानाही सचिन वाझे यांना २०१ अंतर्गत कारवाई का होत नाही, त्यांना कोण वाचवतंय?? आम्हाला संशय आहे की मनसुख हिरेन यांची हत्या ही त्या गाडीत झाली आणि त्यानंतर त्यांची बॉडी खाडीत फेकण्यात आली. हाय टाईडमध्ये ही बॉडी फेकली गेली असती तर ती परत आली नसती. पण सुदैवाने लो टाईड असल्यामुळे ती बॉडी परत आली. त्यामुळे याप्रकरणी २०१ अंतर्गत पुरावे असताना सचिन वाझे यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी फडणवीसांनी सभागृहात केली.
ADVERTISEMENT