सातारा: राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यात अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. सातारा जिल्ह्यातील मोरगिरी, आंबेघर, हुंबरळी तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
ADVERTISEMENT
पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बुधवार 28 जुलै रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
सातारा जिल्ह्यात महापुराचा वेढा पडला असून बाजारपेठ, एसटी स्टँडसह शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. संध्या पुराचे पाणी ओसरले असून आता सर्वत्र चिखल झाला आहे. अनेक भागात दरड कोसळली असुन अनेक जण दगावले आहे.
विरोधी पक्षनेते पुरग्रस्त नुकसानीचा व तेथील परिस्थीतीचा आढावा घेण्याकरीता सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरूवात मोरगिरी, आंबेघर तालुक्यातील पाटण गावापासुन होणार आहे. पाटण गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी दुपारी 2.45 वाजता करणार आहेत.
मोरगिरी, आंबेघर तालुक्यातुन कोयनानगर येथील प्रथमिक केंद्र शाळा येथे स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांची संध्याकाळी 4.30 वाजता भेट घेणार आहेत. त्याचबरोबर हुंबरळी तालुक्यातील पाटण गावामधील अतिवृष्टीग्रस्त भागाची संध्याकाळी 5.15 वाजता पाहणी करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांना करावा लागला होता सातारा दौरा रद्द
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 26 जुलै रोजी सातारा येथे जाऊन तेथील पूरस्थितीची पाहणी करणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर पुन्हा पुण्यात परतलं होतं. सातारा दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरने पुण्याहून उड्डाण केलं होतं. मात्र अत्यंत खराब वातावरण असल्याने एअरफोर्सचं हेलिकॉप्टर पुन्हा पुणे विमानतळावर आणण्यात आलं होतं. त्यानंतर काही वेळाने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं होतं की, मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोयनानगर दौरा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला होता. पुणे ते कोयना नगर हवाई मार्ग अतिशय खराब आहे. त्यामुळे सुरक्षा कारणास्तव मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला. मात्र, असं असलं तरीही कोयनानगर येथील दरडग्रस्त नागरिकांना मदत पोहचवण्यास कोणताही विलंब होता कामा नये असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
ADVERTISEMENT