कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना राज्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीच्या कामात पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत धाराशीव साखर कारखान्याने इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मितीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे.
ADVERTISEMENT
१२ मे पासून या प्रकल्पाला सुरुवात झाली असून या ऑक्सिजनची शुद्धता ९९.६ टक्के इतकी असल्याचं कळतंय. सरकारी नियमांनुसार ऑक्सिजनची तपासणी पूर्ण झाली असून गुणवत्ता चाचणी आणि तपासणीसाठी ३ बबल पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाला सुरुवात होईल अशी माहिती धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली. या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास उस्मानाबाद जिल्ह्यातील ऑक्सिजनचा प्रश्न सुटेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सध्या कोविडच्या दुस-या लाटेमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे यात कोविड रूग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करताना सरकार, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व प्रशासकीय अधिकारी यांची मोठी कसरत व धावपळ होत आहे. अशा परिस्थितीत उस्मानाबाद येथील साखर कारखान्याचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास तो राज्यासाठी पथदर्शी व दिलासा देणारा ठरणार आहे.
अतिरिक्त सामग्रीत ‘मॉलेक्युलर सिव्ह’ वापरून ऑक्सिजनची निर्मीती मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. धाराशिव साखर कारखानात प्रति दिन १६ ते २० टन ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार असल्याने उस्मानाबाद जिल्ह्याचा प्रश्न यातून भागू शकेल. धाराशिव कारखाना प्रकल्पाला मान्यता मिळल्यावर इतर कारखान्यांना हा प्रकल्प सुरू करायचा असल्यास त्यांना मदत व मार्गदर्शन करण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला, इतर कारखान्यांनी होकार दिल्यास अवघ्या 10 ते 15 दिवसात प्रकल्प उभारणी करून देणे शक्य आहे असेही पाटील यांनी सांगितले. राज्यात सध्या ऑक्सिजनची गरज आहे, मोठ्या शहरात तर मागणी मोठी आहे. आगामी काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांनी असेच प्रकल्प सुरू केल्यास उस्मानाबाद हा ऑक्सिजन निर्मितीचा जिल्हा बनून प्राणवायू देणारा जिल्हा बनू शकतो असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
ADVERTISEMENT