पालघर: गुजरातमधील जलपरी या बोटीवर पाकिस्तानी सागरी सुरक्षा सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे (वय 32 वर्ष) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT
श्रीधर हा गुजरातमधील वनगबारा येथील जलपरी बोटीत मागील अनेक महिन्यापासून खलाशी कामगार म्हणून काम करत होता. दरम्यान, काल (7 नोव्हेंबर) श्रीधर ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात बोटीवर मासेमारी करीत होता. त्याचवेळी अचानत पाकिस्तान ट्रॉलर्समधून आलेल्या सागरी सुरक्षा सैनिकांनी गोळीबार सुरु केला.
याच गोळीबारात श्रीधर चामरे याला तीन गोळ्या लागल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचप्रमाणे बोटीचे कॅप्टन तांडेल यांनाही गोळ्या लागल्याने ते देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भर समुद्रात घडलेल्या या भयंकर घटनेचा संपूर्ण मच्छीमार बांधवासहित चामरे कुटुंबीयांनी निषेध व्यक्त केला असून पाकिस्तानविरोधात सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. तसेच श्रीधर चामरेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जावी अशीही मागणी केली जात आहे.
भर समुद्रात नेमकं काय घडलं?
दिल्लीतील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमएसएने भारतीय नौकेवर केलेल्या बेछूट गोळीबाराची भारताने गंभीर दखल घेतली असून हा मुद्दा पाकिस्तानसोबत राजनैतिक पातळीवर उपस्थित केला जाणार आहे. देवभूमी द्वारकाचे पोलीस अधीक्षक सुनील जोशी यांनी सांगितले की, PMSA जवानांनी शनिवारी संध्याकाळी अचानक क्रू मेंबर्सवर गोळीबार केला, ज्यात महाराष्ट्रातील पालघरमधील मच्छीमार श्रीधर चामरे यांचा मृत्यू झाला.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीवर सात क्रू मेंबर्स होते आणि गोळीबाराच्या घटनेत त्यांच्यापैकी एकाला दुखापत झाली. मृत मच्छीमार श्रीधर रमेश चामरे याचा मृतदेह रविवारी ओखा बंदरात आणण्यात आला असून, पोरबंदर नवी बंदर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
जोशी म्हणाले की, चामरे हे सात क्रू मेंबर्ससह 25 ऑक्टोबर रोजी ओखाहून निघालेल्या जलपरी या मासेमारी बोटीवर होते. यापैकी पाच सदस्य गुजरातचे तर दोन महाराष्ट्रातील होते. दरम्यान, या घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Terrorism: साखळी बॉम्बस्फोटाची तयारी झालेली पूर्ण, ATS ने वेळीच आवळल्या दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या
भारतीय तटरक्षक दलाने (ICG) एका निवेदनात म्हटले आहे की पोलीस अधिकारी सध्या या घटनेचा तपास करत आहेत आणि क्रू सदस्यांची संयुक्त चौकशी केली जात आहे. तपासात तथ्य बाहेर आल्यानंतरच या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यात येईल. तथापि, ICG ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, समुद्रात गोळीबार झाला होता ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दुसरा जखमी झाला.
पोलीस अधीक्षक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ येथे या बोटीची नोंदणी करण्यात आली होती. दरम्यान, चामरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वडराई या त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे.
नौकेचे मालक जयंतीभाई राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चामरे यांच्यावर गोळी झाडली तेव्हा ते बोटीच्या केबिनमध्ये होते. काही माध्यमांनी राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात बोटीचा कॅप्टनही जखमी झाला आहे. त्यांनी सांगितले की, चामरे यांचा मृतदेह काही दिवसांत त्यांच्या गावी पोहोचू शकतो.
ADVERTISEMENT