ही अनोखी गाठ कोणी बांधली
ADVERTISEMENT
एक झाले उन आणि सावली
वैभव जोशीचे हे शब्द कानावरती पडतात आणि आपण एक प्रेक्षक म्हणून पुढचे २ तास मंत्रमुग्ध होऊन जातो. पांघरूण सिनेमा आपल्याला काय देतो तर उत्तम अभिनयाची, कथेची, प्रसंगाची, दिग्दर्शनाची, संगीताची अस्सल मेजवानी..
आपण जेव्हा जेवायला बसतो.. समोर ताटात एक एक जिन्नस आपल्याला वाढला जातो.. आणि आपण मनसोक्त पध्दतीने त्यातील प्रत्येक पदार्थाचा आस्वाद मनापासून घेत असतो. आपल्या चेहऱ्यावर आत्मिक समाधान येत असतं. पांघरूणचंही तसंच आहे. यातला एक एक जिन्नस आपल्याला अतीव आनंद देतो.. कारण जेव्हा हे सर्व जिन्नस एकरूप होतात ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला मंत्रमुग्ध व्हायला होतं.
पांघरूण सिनेमा आपल्याला स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात घेऊन जातो.. बा.भ बोरकर यांच्या कथेवर आधारित पांघरूण सिनेमाची कथा.. महेश मांजरेकर आणि गणेश मतकरींची पटकथा आणि गणेश मतकरींचे अप्रतिम संवाद यातून पांघरूण पुढे सरकू लागतो..
तर पांघरूण ही लक्ष्मीची कथा आहे. निसर्गरम्य कोकणात राहणारी लक्ष्मी लहान वयातच विधवा झाली आहे.. लक्ष्मीचे वडील गोव्यात त्याकाळी राज्य असणाऱ्या पोर्तुगीज सरकारच्या बड्या अधिकाऱ्याकडे चाकरी करत असतात. विधवा असूनही लक्ष्मीची आणि त्या बड्या अधिकाऱ्याच्या मुलीची छान गट्टी जमली आहे.. त्या काळात विधवा विवाहाला मान्यता मिळाल्यामुळे लक्ष्मीचे वड़िलही तिचं लग्न जमवण्याचा प्रयत्न करतायत..
दुसरीकडे कोकणातील पालशेत या गावात अंतू गुरूजी आपल्या दोन लहान मुलींसोबत राहत असतात.. अंतू गुरूजी म्हणजे गावातील विद्वान माणूस, भजनसम्राट असणारे अंतू गुरूजींना गावात मान असतो.. मात्र पत्नीचं अकाली निधन झाल्याने त्यांच्या लहान मुलींचा सांभाळ करण्यासाठी त्यांना गावातील त्यांचे मित्र खोत आणि शेजारची राधाक्का पुन्हा लग्न करण्याची गळ घालतात. अश्याप्रकारे लक्ष्मीला तिच्या वडिलांच्या वयाचे असणाऱ्या अंतू गुरूजींचं स्थळ येतं. आधी नाराज असलेली लक्ष्मी वडिलांच्या शब्दांला विरोध करू न शकल्यामुळे अंतू गुरूजींच्या घरात खरंच लक्ष्मी बनून जाते.. अंतू गुरूजी विद्वान असले तरी आपली पहिली पत्नी जानकीला विसरू शकलेले नाहीत.. ह्यात घरात नवीन लग्न होऊन आलेल्या लक्ष्मीला अंतू गुरूजींची आत्यंतिक ओढ लागते. मात्र अंतू गुरूजी आणि लक्ष्मीमध्ये नेहमीचा शारिरीक दुरावा राहतो. सहजीवनातील साथीदाराबद्दलची ओढ आणि त्यातून होणारी तिची घालमेल यात लक्ष्मी भरडली जात असते.. नेमकं लक्ष्मी आपलं प्रेम मिळवते का? तिची ही घालमेल कायमची बंद होते का? हे पाहण्यासाठी ,अनुभवण्यासाठी तुम्हांला पांघरूण सिनेमा पाहण्याची नितांत आवश्यकता आहे.
पांघरूण सिनेमाची चार बलस्थानं आहेत
एक या सिनेमाची कथा, दुसरं सिनेमाचं दिग्दर्शन. तिसरं सिनेमाचं श्रवणीय संगीत आणि चार कलाकारांचा अप्रतिम अभिनय..
महेश मांजरेकरांनी पुन्हा एकदा आपल्या दिग्दर्शनीय भात्यातून प्रेक्षकांना एक विलक्षण अनोखी प्रेमकहाणी भेट दिली आहे.. या सिनेमाची कथा ही निव्वळ अप्रतिम आहे.. सिनेमातील उत्तम संवादांसाठी गणेश मतकरींचं विशेष अभिनंदन..
सिनेमातील कलाकारांनी या सिनेमात जान आणलीय… लक्ष्मीच्या भूमिकेतील गौरी इंगवले आपल्याला सर्वात जास्त प्रभावित करते. विधवा मुलीची अगतिकता, लग्न झाल्यावर सहजीवनातील साथीदाराबद्दलची ओढ आणि त्यातून होणारी तिची घालमेल गौरीने लीलया साकारली आहे.. अंतू गुरूजीच्या भूमिकेतील अमोल बावडेकरनेही आपली भूमिका अगदी समरसून केली आहे. मुळात अमोल एक उत्तम गायक असल्याने त्याने पडद्यावर साकारलेल्या भजनसम्राटाची व्यक्तिरेखा तर उत्तम आहेच पण लक्ष्मीसोबतच्या प्रसंगातही अमोलने लाजवाब अभिनय केलाय.. या दोघांना प्रवीण तरडे, विद्याधर जोशी, सुलेखा तळवलकर, रोहित फाळकेची उत्तम साथ लाभली आहे.
या सिनेमाचं संगीत हा एक परमोच्च बिंदू आहे. या सिनेमातलं प्रत्येक गाणं अप्रतिम आहे.. यात संत तुकाराम आणि संत सावळा माळी यांचे अभंग आहेत. आणि वैभव जोशीने लिहीलेली बाकीची गाणी आहेत. वैभव जोशीचे शब्द काळजाला भिडतात. मात्र प्रत्येक प्रसंगानुरूप वैभवने लिहीलेलं गाण्याचे शब्द निव्वळ लाजवाब आहेत. या सर्व गाण्यांना हितेश मोडक, सलील कुलकर्णी, पवनदीप राजन, अजित परब यांचे संगीत लाभले आहे. आणि प्रत्येकाने अप्रतिम सांगितीक नजराणा आपल्याला बहाल केला आहे.
हा सगळा जिन्नस अतिशय उत्तम जुळून आल्याने मी या सिनेमाला देतोय साडेचार स्टार….
पांघरूण उत्तमच आहे. त्यामुळे ही विलक्षण अनुभुती, वेगळीच प्रेमकहाणी आणि सांगितीक मेजवानी मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची तुम्हांलाही नितांत आवश्यकता आहे…..
ADVERTISEMENT