काबूलच्या उत्तरेकडे असलेल्या पंजशीर प्रांतावर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आलेला असतानाच पंजशीरमधील सशस्त्र संघर्ष थांबला नसल्याचं दिसून येत आहे. पंजशीर प्रांतातील तालिबानच्या ताब्यातील भागांवर हवाई हल्ले करण्यात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतरही पंजशीर प्रांत तालिबानला मिळवता आला नव्हता. तालिबानविरोधी दलांकडून तालिबानी सैन्याला कडवा प्रतिकार करण्यात आला. पण तालिबाननं पराभव करत पंजशीरमधील आठ जिल्हे ताब्यात घेतले. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने सोमवारी पंजशीरवर कब्जा मिळवल्याची माहिती दिली.
यानंतर पंजशीर प्रांतातील तालिबानच्या ठिकाणांवर अज्ञात विमानांनी हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात लष्करी विमानांनी तालिबानच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले असल्याचं वृत्त अफगाणिस्तानातील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानकडून केला जात असला, तरी पंजशीरमधील उत्तर अलायन्स नावाच्या संघटनेकडून तालिबानला कडवा प्रतिकार केला जात आहे. गोरिल्ला युद्ध तंत्राचा वापर करून तालिबानला आव्हान देत असल्याची माहिती समोर आली आहे. या संघटनेचं नेतृत्त्व अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह आणि तालिबान विरोधक अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद करत आहेत.
ADVERTISEMENT