औरंगाबाद: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्याच पक्षाला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला आहे. पैठण-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच त्याला भेगा पडल्याचं निदर्शनास आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच टॅग करुन ट्वीट केलं आहे. ज्यामुळे रस्ते बांधकामातील भोंगळ कारभार देखील समोर आला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या तक्ररीची दखल तात्काळ मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे. याबाबत नितीन गडकरींच्या मंत्रालयाकडून याबाबत अशी माहिती देण्यात आली आहे की, ‘नितीन गडकरींनी संबंधित अधिकाऱ्यांना कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व खराब झालेले पॅनेल लवकरात लवकर बदलण्याचे देखील आदेश त्यांनी दिले आहे.’
पंकजा मुंडेंचं नेमकं ट्विट काय?
‘पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांना पत्र लिहीनच, त्यांनाही हे अजिबात चालणार नाही… तात्काळ दखल घेतली जाईल…’ असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं होतं.
नेमकं प्रकरण काय?
संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचा महामार्ग असणारा, पैठण-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाला पाटोदा तालुक्यात भेगा पडल्याचे समोर आले आहे. कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्याने या रस्त्यावर अपघात होऊ शकतो. म्हणून तात्काळ रस्ता दुरुस्त करून ठेकेदार व अभियंत्या विरोधात कारवाईची मागणी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली होती.
या संदर्भात त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याची तक्रार केली आहे. तर याचविषयी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील ट्विट करुन रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पाटोदा तालुक्यातील पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. घुमरा पारगाव ते अनपटवाडी दरम्यान रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. हे काम तिरुपती कन्स्ट्रक्शनला देण्यात आलेले आहे.
Pandit Nehru, Atal Bihari Vajpayee लोकशाहीतले आदर्श! सर्व पक्षांनी आत्मपरीक्षण करावं-गडकरी
या कामाबाबत तक्रारी, आंदोलन केले तरी यावर कसलीच कारवाई झाली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या कामाची गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदार, अभियंता यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. ढवळे यांनी केली आहे. याच प्रकरणी पंकजा मुंडे यांनी देखील आपल्याच पक्षाला घरचा आहे दिला आहे.
ADVERTISEMENT