इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण वाढू लागल्याने आणि ओमिक्रॉनचं संकटही घोंघावू लागल्याने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिली ते नववीच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आजपासून शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. शाळेत कोरोना प्रतिबंधाच्या नियमांचं पालन केलं जाणार आहे. पालकांनी न घाबरता, काळजी न करता मुलांना शाळेत पाठवावं असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. जालना या ठिकाणी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं.
आजपासून महाराष्ट्रात शाळा सुरू! कुठल्या जिल्ह्यांत शाळा अद्यापही बंद? वाचा सविस्तर
नेमकं काय म्हणाले आहेत राजेश टोपे?
‘महाराष्ट्र शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही पालक मुलांना शाळेत पाठवण्यास विरोध करत आहेत. मात्र तसं पालकांनी करू नये. शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यात येतं आहे. शाळा बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. त्यांचा बौद्धिक आणि सर्वांगिण विकास करण्यासाठी शाळा हा महत्त्वाचा घटक आहे. तसंच त्यांच्या वयाच्या टप्प्यातला हा महत्त्वाचा कालावधी असतो. मुलांना घरी ठेवलं तर मोठं नुकसान होऊन शकतं. राज्यातील शाळा सुरू करत असताना सगळ्या बाबींचा विचार करण्यात आला आहे.’ असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
ज्या जिल्ह्यात अधिक बाधित रूग्ण असतील तिथल्या स्थानिक प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यायचा आहे असं आम्ही सूचित केलं आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा अशाही सूचना आम्ही दिल्या आहेत. कुणीही कोरोना बाधित आढळलं तर इतरांचीही तपासणी करून योग्य ती खबरदारी आम्ही घेणार आहोत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
सध्या राज्यात 90 ते 95 टक्के बेड्स रिकामे आहेत. आयसीयू किंवा ऑक्सिजन बेड्सही 95 टक्के रिकामे आहेत. 90 टक्के लोक हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. शाळा सुरू करण्याआधी आम्ही टास्क फोर्सशीही याबाबत चर्चा केली आहे. रूग्णालयात रूग्ण दाखल करण्याचं प्रमाण कमी राहिलं तर सध्या सुरू असलेले निर्बंध हे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आणखी कमी करता येऊ शकतील असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
राज्यात लसीकरणाची स्थिती समाधानकारक आहे. आम्ही नागरिकांना विनंती केली आहे की ज्यांचा दुसरा डोस घेणं बाकी आहे त्यांनी तो लवकरात लवकर घ्यावा. तसंच ज्यांचं लसीकरण झालेलं नाही त्यांनीही तातडीने लसीकरण करून घ्यावं असंही आवाहन आम्ही जनतेला केलं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT