मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज एक महत्वाची घोषणा केली आहे. पासपोर्टच्या पडताळणीसाठी यापुढे मुंबईकरांना आता पोलीस स्टेशनमध्ये हजर रहावं लागणार नाहीये. ज्या ठिकाणी कागदपत्र अपूर्ण असतील तिकडे मात्र अर्जदारांना पोलीस स्टेशनमध्ये हजर रहावं लागणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोलीस आयुक्तांनी याची घोषणा केली असून यापुढे पासपोर्टच्या पडताळणीसाठी स्थानिक पोलीस स्टेशनमधून कॉन्स्टेबल अर्जदाराच्या घरी येणार आहे. जर या नियमाचं पालन केलं जात नसेल तर याबद्दल तक्रार करण्याचं आवाहन संजय पांडे यांनी केलं आहे.
पासपोर्ट व्हेरिफिकेशन ही प्रत्येक अर्जदारासाठी खूप वेळखाऊ प्रक्रीया मानली जाते. अनेकदा या व्हेरिफीकेशनसाठी अर्जदारांना पोलीस स्टेशनमध्ये लाईन लावावी लागते. ज्यातून भ्रष्टाचार आणि लाचखोरीची काही प्रकरणं समोर येतात. याला आळा घालण्यासाठी नवनिर्वाचीत पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय.
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यानंतर संजय पांडे यांनी सोशल मीडियावरुन वारंवार मुंबईकरांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. अनेकदा शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, नागरिकांना भेडसावणारे अनेक मुद्दे संजय पांडे यांनी स्वतः लक्ष घालून सोडवले आहेत.
काही दिवसांपूर्वी संजय पांडे यांनी शहरातील बिल्डर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर काम सुरु ठेवू नये असे आदेश दिले होते. काही ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी कन्स्ट्रक्शनच्या कामामुळे झोप लागत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. ज्यानंतर संजय पांडे यांनी बिल्डर प्रतिनिधींना ध्वनीप्रदूषण आणि इतर नियमांचं पालन करण्याचा सल्ला दिला होता.
ADVERTISEMENT