कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रात परिस्थिती आता हळुहळु नियंत्रणात येत असल्याचं चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येपेक्षा कोरोनावर मात करुन घरी परतणाऱ्या रुग्णांची आकडेवारी जास्त आहे. हाच ट्रेंट आजही कायम राहिला आहे. राज्यात आज २६ हजार ६७२ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून २९ हजार १७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
ADVERTISEMENT
आतापर्यंत राज्यात कोरोनावर मात करुन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ही ५१ लाख ४० हजार २७२ एवढी झालेली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही किंचीतशी वाढ झाली असून ही आकडेवारी आता ९२.१२ टक्क्यांवर पोहचली आहे.
आज राज्यात ५९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्याचा सध्याचा मृत्यूदर हा १.५९ टक्के इतका आहे. एकीकडे राज्याची अशी परिस्थिती असताना मुंबई महानगपालिका क्षेत्रातही हाच ट्रेंड बघायला मिळाला.
मुंबईत ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रुग्णसंख्येची साखळी मोडण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन या उपक्रमाअंतर्गत राज्यात लॉकडाउन आणि इतर निर्बंध घातले. आजही अनेक भागांमध्ये कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात येत आहे. याच निर्बंधांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात सरकारला यश येताना दिसत आहे. त्यामुळे यापुढेही लॉकडाउनच्या नियमांचं असचं पालन झालं तर दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश येईल असं चित्र सध्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय.
ADVERTISEMENT