नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर काय घडलं ते महाराष्ट्राने मंगळवारचा पूर्ण दिवसभर अनुभवलं. नारायण राणे विरूद्ध शिवसेना, शिवसेना विरूद्ध भाजप आणि राज्य सरकारविरूद्ध केंद्र सरकार असा सामना पाहण्यास मिळाला. नारायण राणे यांना अटक करण्यात आली. त्याचे पडसाद आजही उमटताना दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट करून नारायण राणेंना खिजवलं आहे.
ADVERTISEMENT
काय आहे हा फोटो?
एका वाघाने कोंबडीची शिकार केली आहे असं या फोटोत दाखवण्यात आलं आहे. नारायण राणेंना कोंबडी चोर म्हटलं जातं. शिवसेनेने तशी पोस्टरबाजीही केली होती. आता संजय राऊत यांनी वाघाने कोंबडीची शिकार केल्याचा सूचक फोटो ट्विट केला आहे. नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाली तेव्हापासून त्यांना कोंबडी चोर असं संबोधलं जातं. वाघ ही शिवसेनेची खूण आहे. शिवसेनेचा उल्लेख हा कायमच वाघ असा केला जातो. त्यामुळेच संजय राऊत यांनी हा सूचक फोटो ट्विट केला आहे.
नारायण राणेंना कोंबडीचोर का म्हटलं जातं?
शिवसेनेची स्थापना करण्यात आली तेव्हाच नारायण राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. बाळासाहेब ठाकरे यांचं वलय आणि शिवसेनेसारखा आक्रमक पक्ष यामुळे अगदी लहान वयातच नारायण राणे हे शिवसेनेकडे ओढले गेले होते.
सुरुवातीच्या काळात ते मुंबईतील चेंबूरमध्ये राहत होते. इथे बाळासाहेबांची होणाऱ्या भाषणाला ते आवर्जून हजर राहायचे. यावेळी वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेचं सदस्यत्व मिळविण्यासाठी तेव्हा 18 वर्षांची अट असायची मात्र, राणेंनी आपलं वय अधिकचं असून शिवसेनेते प्रवेश मिळवला होता.
या सगळ्या दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती ही हालाखीची होती. त्यामुळे नारायण राणेंना अनेक कामं करायला लागायची. अशावेळी नारायण राणे यांचा एक मित्र होता हनुमंत परब नावाचा. चेंबूरच्या सुभाषनगर भागात ही जोडी खूपच फेमस होती.
नकळत्या वयात हे दोघेही जण चेंबूरमध्ये काहीसे हुल्लडबाजी करायचे. त्यावेळी या दोन्ही मित्रांनी काही कोंबड्या देखील चोरल्या असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. असं म्हटलं जातं की, त्यांची ही चोरी एकदा पकडली गेली होती. तेव्हा शिवसेनेच्या एक तालेवार नेत्याने या दोघांना सोडवलं होतं.
शिवसेनेत गेल्यानंतर राणे यांना सत्तेची अनेक पदं मिळत गेली. एवढंच नव्हे तर राज्याचं सर्वोच्च असं मुख्यमंत्रीपद देखील त्यांना मिळालं. पण शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर अस्वस्थ राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इथूनच नारायण राणे आणि शिवसेना असा वाद निर्माण झाला.
जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा सेनेला त्याचा बराच फटका बसला होता. कारण त्यांचे अनेक आमदार हे राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेले होते. अशावेळी सुरुवातीच्याच काळात बाळासाहेबांनी ज्या सभा घेतल्या त्यात नारायण राणे यांना कोंबडीचोर असं संबोधण्यास सुरुवात केली. अगदी शेवटपर्यंत बाळासाहेब हे आपल्या जाहीर सभांमधून राणेंना अशाच प्रकारे बोलायचे.
तेव्हापासूनच अनेकदा नारायण राणे यांना शिवसैनिक देखील कोंबडीचोर म्हणून त्यांच्यावर टीका करतात. 2017 साली वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा पराभव झाल्यानंतर देखील शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर कोंबड्या आणून जल्लोष साजरा केला होता.
ADVERTISEMENT