उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील हत्याकांडाविरुद्ध महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने बंदची घोषणा केली आहे. ११ ऑक्टोबरला राज्यात बंदची घोषणा करण्यात आली असून सत्तेतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या बंदत सहभागी होणार आहेत.
ADVERTISEMENT
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहतील अशी घोषणा यावेळी तिन्ही पक्षांच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. परंतू मनसेच्या चित्रपट सेनेने या बंदमधून चित्रीकरणाला वगळावं अशी विनंती केली आहे.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आक संदेश जाहीर करत बंदमधून चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला वगळावं असं म्हटलंय. “लखीमपूर येथील दुर्दैवी दुर्घटना,शेतकरी आंदोलन याबद्दल आम्हाला नक्कीच सहानुभूती आहे. पण त्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’चा हाक देणाऱ्या महाविकास आघाडीला विनंती आहे की ११ ऑक्टोबरला चित्रपट,वाहिन्यांवरील मालिका यांचे चित्रीकरण सुरु ठेवावेत. लॉकडाउन काळात चित्रपट,नाटक व संबंधीत तंत्रज्ञ, कामगार यांनी बंद मुळे बरंच भोगलंय. आता पुन्हा एक दिवस काम बंद ठेवलं तर आर्थिक नुकसान सोसावं लागेल.”
याच कारणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये चित्रीकरण थांबवू नयेत ही तमाम चित्रपट इंडस्ट्रीतर्फे आम्ही मागणी करत आहोत. शासनाने या क्षेत्राचा गांभिर्याने विचार करावा अशी मागणी मनसेने केली आहे. दुसऱ्या लाटेत लॉकडाउनदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या नियमांमध्ये राज्यात चित्रीकरणाला परवानगी नाकारली होती. यावेळी अनेक मराठी आणि हिंदी मालिकांचं चित्रीकरण हे गुजरात, राजस्थान अशा भागांत झालं होतं. यानंतर राज्य सरकारने महाराष्ट्रात चित्रीकरणाला परवानगी दिली होती. त्यामुळे सोमवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT