मुंबई: भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं मंत्रिपद हुकल्याने त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी राजीनामा सत्र सुरु केलं. याच दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे या दिल्लीला देखील रवाना झाल्या. याचवेळी पंकजा मुंडे यांची पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगली होती की, पंतप्रधान मोदी यांनी पंकजा मुंडे यांना एकूणच नाराजी नाट्याबाबत झापलं. मात्र, असं कधीही झालं नाही, मला कधीही मोदींनी अपमानित केलं नाही असं पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितलं.
ADVERTISEMENT
‘मला पंतप्रधानांनी कधीही अपमानित केलं नाही’
‘कुणी म्हणतं मला प्रधानमंत्री व्हायचं आहे ते चालतं? ते चालतं का? मी का म्हणायचं नाही? मी म्हणले नाही, कधी म्हणणार नाही. माझ्या देशाचे प्रधानमंत्री, जगात सर्वोच्च मान वाढवणाऱ्या पंतप्रधानांनी मला कधी अपमानित केलं नाही. माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी मला कधी अपमानित केलेलं नाही.’
‘माझ्या या गोष्टीमध्ये त्यांनी कधीही मला याबाबत प्रश्न विचारलेले नाही. तुम्हाला साक्ष ठेऊन सांगते की, मला कधीही त्यांनी कुठलाही प्रश्न विचारला नाही. माझ्या पिढीची त्यांना जाणीव आहे. असं मला वाटतं, असा मला विश्वास आहे. नक्कीच मला भविष्यात तुम्हा सर्वांसकट न्याय हवा आहे. मला एकटीला न्याय नकोय.’ असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला कधीही अपमानित केलं नाही. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्याबाबत जी चर्चा सुरु झाली त्याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
पदाधिकाऱ्यांचे राजीनामे केले नामंजूर
प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदातून डावलल्यानंतर बीडमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले. याच राजीनाम्यांबाबत पंकजा मुंडे यांनी निर्णय घेतला आहे. त्यावेळी त्या असं म्हणल्या की, ‘तुमच्या सर्वांचे राजीनामे मी नामंजूर करत आहे. मला प्रवास खडतर दिसत आहे पुढेही खडतर आहे मागेही खडतर होता. मी इलेक्शनमध्ये हरले असले तरीही संपलेले नाही. संपले नसते तर मला संपवण्याचे प्रयत्नही थांबले असते. पण मी संपलेली नाही.’
यावेळी पंकजा मुंडे असंही म्हणाल्या की, ‘योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. अविचाराने कोणताही निर्णय का घ्यायचा?’ असं म्हणत आपण भाजप सोडणार नसल्याचंच यावेळी त्यांनी जवळपास स्पष्ट केलं आहे.
Pankaja Munde: ‘मी त्यांचा अपमान का करु?’, Pritam Munde यांच्या मंत्रिपदावरुन पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?
यावेळी पंकजा मुंडे यांनी कुणावरही थेट हल्लाबोल केला नाही. मात्र, आपल्या खास शैलीतून त्यांनी पक्षातील विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. याच वेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याबाबत देखील खंत व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT