६ नोव्हेंबर रोजी अहमदनगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या ICU ला लागलेल्या आगीत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत आतापर्यंत ६ जणांवर कारवाई झाली असून ४ कर्मचाऱ्यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ. विशाखा शिंदे यांचाही समावेश आहे.
ADVERTISEMENT
परंतू पोलिसांच्या या कारवाईवर आता वैद्यकीय क्षेत्रातून आवाज उठवला जात असून जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. पोलिसांनी घाईघाईने अटकेची कारवाई केल्याचं येथील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
अहमदनगर पोलिसांच्या या कारवाईवर सोशल मीडियावर नेटकरी आणि इतर डॉक्टरांमध्ये चोर सोडून संन्यासाला फाशी अशी प्रतिक्रीया उमटत आहे. बेरियाट्रिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी देखील ट्विट करत डॉ. विशाखा शिंदे यांना झालेल्या अटकेवर भाष्य केलं आहे.
डॉ. विशाखा ह्या एका सरकारी रुग्णालयात आपली जबाबदारी बजावत होत्या. त्या तिथे एक शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होत्या. रुग्णालय प्रशासन आणि नियोजन यांच्याशी त्यांचा काही एक संबंध नव्हता. त्यामुळे जर काही तांत्रिक कारणांमुळे आग लागली असेल तर डॉ. विशाखा ह्यांना त्या प्रकरणी दोषी ठरवणे सर्वस्वी चुकीचे आहे. रुग्णालयातील आग रोधक यंत्रणा आणि त्याची तपासणी याच्याशी त्यांचा काही एक संबंध नाही. तरीही त्यांना या प्रकरणी गोवण्यात येत आहे. डॉ. विशाखा ह्यांचा बळी देऊन खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची ही खेळी आहे. ड्युटीवर असणारा डॉक्टर रुग्ण तपासणी करेल की वार्ड मधील वायरी आणि इलेक्ट्रॉनिक वास्तू तपासेल? असा संतप्त सवाल डॉ. तोडकर यांनी उपस्थित केला आहे.
पदव्युत्तर शिक्षण घेऊन समाजात नावारुपाला येण्याच्या डॉ. विशाखा ह्यांच्या स्वप्नाला ह्यामुळे सुरुंग लागला आहे. आज डॉ. विशाखा आहेत, उद्या तुम्ही किंवा मी असु शकेल. त्यामुळे ह्या विरोधात बोलले गेलेच पाहिजे. एक डॉक्टर म्हणून डॉ. विशाखा ह्यांना त्यांच्या प्रोफेशन मधील माणसांची गरज आहे. आपल्या वैयक्तिक पातळीवर तसेच आपण ज्या कुठल्या संघटनेत असाल त्या संघटनेच्या पातळीवर डॉ. विशाखा ह्यांना समर्थन आपण कराल आणि एका आपल्यातीलच डॉक्टरच आयुष्य उध्वस्त होण्यापासून त्यांना वाचवाल ही अपेक्षा असं आवाहन डॉ. तोडकर यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT