मला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर आहे. मला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आहे. मला अटक केली जावी म्हणून पोलिसांना सतत चाणक्यांचे फोन येत होते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता चाणक्य कोण या चर्चा सुरू झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आलं त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत जितेंद्र आव्हाड नातेवाईकांशी बोलताना?
जितेंद्र आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आलं त्यावेळी नातेवाईकांशी बोलताना आव्हाड म्हणाले की, “मी स्वतःहून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आलो होतो. मात्र मला खोटं ठरवून अटक करण्यात आली. मला अटक केली जावी म्हणून पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. माझी अटक बेकायदेशीर आहे. अटक करताना नियमांचं पालन केलं गेलं नाही. तसंच प्रोटोकॉलही पाळला गेला नाही. मला अटक करण्यात यावी म्हणून चाणक्यांचे सतत पोलिसांना फोन येत होते” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी उल्लेख केले चाणक्य नेमके कोण? याची चर्चा न्यायालय परिसरात आणि राजकीय वर्तुळातही रंगली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या जामिनावर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आव्हाड यांचे वकील प्रशांत कदम यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला.
आव्हाड यांच्या विरोधात लावण्यात आलेली ११ कलमं चुकीची आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यात कलम ७ लावलं जात नाही. तरीही हे कलम लावण्यात आलं. त्यामुळे ही कारवाई हेतुपुरस्सर करण्यात आल्याचा युक्तिवाद कदम यांनी केला.आव्हाड यांना अटक करताना कोणत्याही नियमांचं पालन केलं गेलं नाही. त्यामुळे त्यांची अटक बेकायदेशीर ठरत असून त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणीही कदम यांनी कोर्टाकडे केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. चार दिवसांपूर्वी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती आहे. याबाबत स्वतः आव्हाड यांनी पोस्ट करुन माहिती दिली. यात त्यांनी आपल्याला अटक केलं असल्याचं म्हटलं आहे.
यानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपण या अटकेचं मनापासून स्वागत करत असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, दुपारी १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला. नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.
ADVERTISEMENT