महाराष्ट्रातल्या वारकरी पंथासाठी महत्वाचा सण मानल्या जाणाऱ्या आषाढी एकादशीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सरकारने यंदाच्या वारीसाठी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना नियम आखून दिले आहेत. पायी वारी सोहळ्याला यंदा बंदी असली तरीही पंढरपूरात विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना यंदा एका वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागतो आहे.
ADVERTISEMENT
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर यंदा नेहमीप्रमाणे खड्ड्यांच साम्राज्य पहायला मिळत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना यंदा याच खड्ड्यांमधून मार्ग काढत प्रवास करावा लागणार आहे. वयोवृद्ध आणि दिव्यांग वारकऱ्यांना या खड्ड्यांचा त्रास होताना दिसत आहे. रस्त्यावर खड्ड्यांमधले दगड-माती पायात रुतून काही वारकऱ्यांना इजाही होत आहे.
प्रत्येकवर्षी आषाढी वारीच्या आधी शहरातील रस्त्यांची डागडुजी केली जाते. यंदा कोरोनाच्या सावटामुळे पायी वारी होणार नसली तरीही स्थानिक आणि जवळपासच्या भागातून येणाऱ्या वारकऱ्यांना प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. स्थानिक प्रशासनाकडे वारंवार विनंती करुनही हे रस्ते दुरुस्त होत नसल्यामुळे स्थानिक नागरिक आणि वारकऱ्यांसाठी यंदाच्या वारीची वाट बिकटच असणार असं दिसतंय.
ADVERTISEMENT