– मनीष जोग, जळगाव
ADVERTISEMENT
वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी एखाद्या मोठ्या व्यक्तीने करावं असं काम जळगावच्या शिवांगी काळे या चिमुकलीने केलं. शिवांगीचं नाव चर्चेत आलं, ते तिचा पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर… शिवांगी प्रसाद काळे या चिमुकलीने नकळत्या वयात जे धाडस आणि प्रसंगावधान दाखवलं त्यांची कहाणी ऐकून तुम्हालाही तिचं कौतूक करायचा मोह आवरता येणार नाही.
शिवांगी प्रसाद काळे… वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. आई भारतीय नौदलातून लेफ्टनंट कमांडर पदावरून सेवानिवृत्त. आपल्या आईबाबांसोबत शिवांगी जळगावमधील कोल्हेनगरमध्ये राहते.
५ जानेवारी २०२१ रोजी काय घडलं?
शिवांगीला ज्या घटनेमुळे पंतप्रधान राष्ट्रीय बालपुरस्कार मिळाला, ती घटना घडली होती ५ जानेवारी २०२१ रोजी! त्या दिवशी सकाळी ९ वाजता शिवांगी आपल्या लहान बहिणीसोबत घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी शिवांगीच्या आईने म्हणजेच गुलबन्सी काळे यांनी अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवलं. बादलीमध्ये हिटर लावलेलं होतं. दरम्यान, विजेचा प्रवाह सुरू असतानाच गुलबन्सी यांनी पाणी तापलंय का यांचा अंदाज घेण्यासाठी बादलीत हात टाकला अन् त्यांना विजेचा धक्का लागला.
अभिमानास्पद! महाराष्ट्रातील चार बालकांचा पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
शॉक लागल्यानंतर शिवांगीची आई जोराने किंचाळली. हा आवाज ऐकून बाहेर खेळत असलेली शिवांगी धावतच घरात आली. तिच्या मागे आलेल्या छोट्या बहिणीला शिवांगीने आधी दूर केलं. त्यानंतर प्लास्टिकचा स्टूल आणून त्यावर चढून बटण बंद केल आणि हिटरचा विद्युत प्रवाह बंद केला. अवघ्या काही वेळातच शिवांगीने हे केलं आणि गुलबन्सी यांचा जीव वाचला होता.
शिवांगीने अल्पवयात दाखवलेली हुशारी आणि धाडसाची सरकारने दखल घेतली आणि तिची शौर्य श्रेणीतील पंतप्रधान राष्ट्रीय बालपुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शिवांगीच्या गौरवामुळे जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
कोरोना निर्बंधांमुळं शिवांगीला हा पुरस्कार जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी प्रदान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती इराणी हे ऑनलाईन उपस्थित होते. या पुरस्कारानंतर शिवंगीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
ADVERTISEMENT