Ramdas Athawale: ठाकरेंसोबत आंबेडकरांची युती, आठवलेंची झाली पंचाईत?

मुंबई तक

25 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:12 AM)

Ramdas Athawale in political trouble: मुंबई: भारतीय रिपब्लिकन पक्ष (RPI) चे अध्यक्ष रामदास आठवलेंना (Ramdas Athawale) घेऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला होता. पुढे आठवले भाजपसोबत (BJP) गेले आणि केंद्रात त्याना मंत्रिपद देण्यात आलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) जोगेंद्र कवाडेंसोबत युती करुन रिपब्लिकन पार्टीच्या कवाडे गटाशी हात मिळवणी […]

Mumbaitak
follow google news

Ramdas Athawale in political trouble: मुंबई: भारतीय रिपब्लिकन पक्ष (RPI) चे अध्यक्ष रामदास आठवलेंना (Ramdas Athawale) घेऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला होता. पुढे आठवले भाजपसोबत (BJP) गेले आणि केंद्रात त्याना मंत्रिपद देण्यात आलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) जोगेंद्र कवाडेंसोबत युती करुन रिपब्लिकन पार्टीच्या कवाडे गटाशी हात मिळवणी केली. तर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) प्रकाश आंबेडकरांसोबत (Prakash Ambedkar) युती करुन एक नवीन समीकरण तयार केलं आहे. या सगळ्या युती-आघाडीमध्ये रामदास आठवले मागे पडले का? असा प्रश्न विचारला जात आहे. हा प्रश्न विचारण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आठलेंनी जाहीररित्या व्यक्त केलेली नाराजी. (prakash ambedkar alliance with thackeray kawade alliance with shinde now ramdas athawale in political trouble)

हे वाचलं का?

रिपब्लिकन पार्टीच्या आठवले गटाचं एक दिवसीय अभ्यास शिबीर महाबळेश्वरमध्ये पार पडलं. यावेळी भाषणामध्ये आठवलेंनी आपली नाराजी व्यक्त केली. आठवले म्हणाले ‘रिपब्लिकन पक्ष भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत युतीमध्ये असून आगामी सर्व निवडणुका आम्ही भाजप बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत युती करुन लढणार आहोत. मात्र, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यासोबत आमच्या रिपब्लिकन पक्षाचे नाव घेतले जात नाही. ही खंत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगणार आहोत.’

आठवलेंच्या या जाहीर नाराजीमुळे आठवलेंच्या गटात सर्वकाही आलबेल नाही याचाच प्रत्यय येतोय. कुठल्याही निवडणुकीत दलित मतांचा फॅक्टर महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक पक्ष रिपब्लिकन पक्षाच्या एखाद्या गटाला आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आठवलेंना सोबत घेऊन शिवसेनेने शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग केला होता. परंतु सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पुढे आठवले भाजपसोबत गेले. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि पुढं केंद्रात मंत्री करण्यात आलं. 2014 पासून आठवले आता मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री आहेत.

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर एकत्र नांदू शकतील का? इतिहास काय सांगतो?

2019 च्या निवडणुका भाजपसोबत एकत्र लढलेले असताना शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करत महाविकास आघाडीचा प्रयोग केला. कोणाला वाटत नसताना शिंदेंनी बंड करत फडणवींसोबत सरकार स्थापन केलं. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे फडणवीसांनी याबाबत अमित शहांची देखील भेट घेतली आहे. आता या मंत्रिमंडळ विस्तारात आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपदाची अपेक्षा आहे.

मागे साताऱ्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आठवलेंनी याबाबतचं भाष्य देखील केलं होतं. परंतु आता बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंनी कवाडेंना आपल्यासोबत घेतल्याने आठवलेंची बार्गेनिंक पॉवर कमी झाल्याचं बोललं जातं आहे. त्यातच 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणावर मतं मिळवली होती.

अनेक मतदारसंघामध्ये वंचितचे उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला असा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच सर्व रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी करावं असं आठवले वारंवार म्हटले आहेत. परंतु प्रकाश आंबेडकर आठवलेंना सोबत घेण्यास तयार नाहीत.

RPI मोदी सरकारसोबत असताना राज ठाकरे यांची गरजच काय?: आठवले

उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतल्याने येत्या निवडणुकीत रिपब्लिकन मतं प्रकाश आंबेडकर त्याचबरोबरच ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता आहे. पर्यायाने आठवलेंची अडचण होण्याची शक्यता आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या याच अधिवेशनात रिपाइंचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी देखील ठाकरे-आंबेडकरांच्या युतीबाबत भाष्य केलं आहे, त्याचबरोबर भविष्यातील अडचण देखील बोलून दाखवली आहे.

महातेकर म्हणाले, ‘रामदास आठवले यांनी 11 वर्षांपूर्वी केलेली शिवशक्ती-भीमशक्ती भाजप युती यशस्वी ठरली. त्यावेळी कोणीही आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व शिवसेना किंवा भाजपशी युती करण्याची हिंमत करीत नव्हते. मात्र, ती युती आठवले यांनी यशस्वी करून जनतेने स्वीकारल्यानंतर अलीकडे जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती करून 11 वर्षांपूर्वी रामदास आठवले यांनी घेतलेली भूमिका योग्य होती हाच संदेश दिला आहे. मात्र त्यांनी रामदास आठवले यांच्यासोबत एकत्र येऊन ही भूमिका घेतली असती तर ती आंबेडकरी रिपब्लिकन राजकारणाची ताकद वाढविणारी भूमिका ठरली असती.’

या सगळ्यामुळे आता येत्या काळात रामदास आठवले नेमकी काय भूमिका घेतात आंबेडकर त्यांना सोबत घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    follow whatsapp