पंतप्रधान खोटं बोलले, हे सुद्धा काँग्रेसला सभागृहात बोलता आलं नाही -प्रकाश आंबेडकर

मुंबई तक

• 12:09 PM • 08 Feb 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानावरून महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. सोशल मीडियावर मोदींच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला जात असून, राजकीय नेत्यांनीही पंतप्रधानांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींच्या विधानावर भूमिका मांडतानाच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाचं भाष्य केलं. पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी विविध मु्द्यांवर भूमिका मांडली. ‘उत्तर प्रदेशात पहिल्या […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानावरून महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. सोशल मीडियावर मोदींच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला जात असून, राजकीय नेत्यांनीही पंतप्रधानांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींच्या विधानावर भूमिका मांडतानाच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वाचं भाष्य केलं.

हे वाचलं का?

पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी विविध मु्द्यांवर भूमिका मांडली. ‘उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान 10 तारखेला होतं आहे. दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. त्या बैठकीत उत्तर प्रदेश आणि देशातील राजकारणाची चर्चा झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून दबंग राजकारण केलं जात आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे.

‘वंचित बहुजन आघाडीचं असं मत आहे की, 2024 मध्ये भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा सत्तेत आला, तर संविधान बदलण्याची ती सुरुवात होईल. आरएसएस, भाजपच्या राजकारणाचा रस्ता हा उत्तर प्रदेशातून जातो. त्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही बसपा, चंद्रशेखर आझाद यांच्यासंदर्भातही चर्चा केली. निष्कर्ष असा निघाला की, दोघंही भाजपला हरवू शकतील अशा स्थिती नाहीत. समाजवादी पक्ष आणि भाजप यामध्ये लढाई होताना दिसत आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांना सपाला मदत करण्याच आवाहन करतो’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘2024 नंतर देशात संविधान टिकवून ठेवायचं असेल, तर या निवडणुकीत आरएसएस, भाजपचा पराभव करणं गरजेचं आहे. समाजवादी पक्षाची सरकार यावं अशीच आमची इच्छा आहे. त्यामुळे मी आंबेडकरवाद्यांना आवाहन करतो की, स्वतःचं अस्तित्व आपण पुन्हा निर्माण करू शकतो. त्यामुळे बसपा किंवा चंद्रशेखर आझादांचा विचार करू नये. संविधान वाचवण्यासाठी समाजवादी पक्षाला मतदान करावं,’ असं आवाहन आंबेडकर यांनी केलं.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईतून मजुरांना त्यांच्या घरी परत पाठवले. उत्तर प्रदेशात, पंजाबमध्ये, उत्तराखंडमध्ये कोरोना पसरवला,’ असं विधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केलं होतं. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी सभागृहात खोटं बोलले, हे सुद्धा काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते सभागृहात बोलू शकले नाही. देशात कोरोना मोदी घेऊन आले’, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

मुंबई महानरपालिकेच्या निवडणुकीबद्दलही प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली. ‘मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी आम्ही गांभीर्याने लढणार आहोत. युतीसाठी आम्ही सर्वांनासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत. फक्त भाजप आणि आरएसएस सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची आमची तयारी आहे’, अशी माहिती आंबेडकर यांनी यावेळी दिली.

    follow whatsapp