प्रताप सरनाईकांनी तुळजाभवानीचरणी अर्पण केले ७२ तोळे सोने; सांगितलं हे कारण

मुंबई तक

• 12:28 PM • 24 Nov 2022

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी चरणी ७२ तोळे सोने अर्पण केले. आमदार सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून जवळपास ३७ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने देवीचरणी अर्पण करण्यात आले आहेत. संपूर्ण सरनाईक कुटुंबाने मनोभावे देवीचं दर्शन घेऊन नवसपूर्ती केली. दोन्ही मुलांची लग्न होऊन सगळं काही व्यवस्थित होऊ देत, असा नवस सरनाईक यांनी देवीला […]

Mumbaitak
follow google news

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी चरणी ७२ तोळे सोने अर्पण केले. आमदार सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून जवळपास ३७ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने देवीचरणी अर्पण करण्यात आले आहेत. संपूर्ण सरनाईक कुटुंबाने मनोभावे देवीचं दर्शन घेऊन नवसपूर्ती केली. दोन्ही मुलांची लग्न होऊन सगळं काही व्यवस्थित होऊ देत, असा नवस सरनाईक यांनी देवीला बोलला होता. त्यानुसार आज सरनाईक कुटुंबाने तुळजापूरला येऊन नवसपुर्ती केली.

हे वाचलं का?

याकारणामुळं देवीला अर्पण केलं सोनं

तुळजाभवानी देवी आमची कुलदैवत आहे. दोन्ही मुलांच्या लग्नाच्या वेळी आम्ही देवीला नवस बोललो होतो. आज माझ्या नातवंडांचं जावळ काढायचं होतं. त्यामुळे नवस फेडण्यासाठी आम्ही सगळे कुटुंबीय देवीला आलेलो आहोत, असं प्रताप सरनाईक म्हणाले. ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्यांचा हार असा नवस मी देवीला बोललो होतो. त्यानुसार आज सगळ्या कुटुंबाला घेऊन मी देवीचरणी लीन झालो. नवस फेडला”, अशा भावना प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केल्या.

“कोरोनाच्या काळामध्ये खूप निर्बंध असल्याने यायला जमलं नव्हतं. मात्र आज पूर्वनियोजन करुन आम्ही सगळे कुटुंबीय देवीला आलेलो आहोत. वर्षभरातून दोन-चार वेळा तरी देवीच्या दर्शनाला येत असतो. पण आज खास नवस फेडायला आलो”, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ईडीची कारवाई ही न्यायालयीन प्रक्रियेत आहे. तो लढा आम्ही लढणार असून न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, असं सरनाईक म्हणाले.

भले रक्त सांडले तरी चालेल पण एकही गाव देणार नाही- आमदार प्रताप सरनाईक

भले रक्त सांडले तरी चालेल मात्र महाराष्ट्राचा एकही गाव जाऊ देणार नाही, असे सांगत आमदार प्रताप सरनाईक यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांचा निषेध केला. कुठल्याही पक्षाचे मुख्यमंत्री असले तरी महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील सरनाईक यांनी दिला. एकही गाव कर्नाटक किंवा इतर राज्यात जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावर केली टीका

नेहमी मराठी-मराठी म्हणणारे नेते आता उत्तर प्रदेश बिहारला जात आहेत त्यामुळे मराठी लोकांच्या मनात संशय निर्माण होत आहे, असा टोला आमदार प्रताप सरनाईक यांनी आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावर लागवला. मुंबईत राजकारण करत असताना मराठी सोबत इतर लोकांना सोबत घेऊन जाणे ही काळाची गरज आहे, हे त्यांनी ओळखले आहे, असं देखील सरनाईक म्हणाले.

    follow whatsapp