द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा, देशाचे १५वे राष्ट्रपती कोण? या प्रश्नाचं उत्तर आज (२१ जुलै) सायंकाळपर्यंत मिळेल. सकाळी ११ वाजता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत मतमोजणी चालणार असून, ४ वाजता निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं.
ADVERTISEMENT
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएकडून द्रौपदी मुर्मू या उमेदवार आहेत, तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत. विरोधकांच्या तुलनेत एनडीएच्या बाजूने जास्त मतदान झालं असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू जिंकल्यास, देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरणार आहेत.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे २५ जुलै रोजी देशाचे नवे राष्ट्रपती पदाची शपथ घेतील.
मिळालेल्या माहितीप्रमाणे राष्ट्रपतीपदाच्या मतमोजणीआधी आमदारांच्या मतांची छाननी केली जाईल. त्यानंतर खासदारांच्या आणि त्यानंतर निवडणूक अधिकारी राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी मतांची पडताळणी करतील. नियमाप्रमाणे खासदारांच्या मतपत्रिकांवर हिरव्या रंगाने, तर आमदारांच्या मतपत्रिकांवर गुलाबी रंगात लिहिलेलं असेल.
मतमोजणीदरम्यान केंद्रात द्रौपदी मुर्मू आणि यशंवत सिन्हा यांच्या नावाचे स्वतंत्र बॉक्स असतील. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांना मिळालेली पहिल्या पसंतीची मते या बॉक्समध्ये टाकली जातील. छाननी पूर्ण झाल्यानंतर मतांची मोजणी केली जाईल.
राष्ट्रपती निवडणूक : चार वेळा सांगितली जाईल माहिती
पीसी मोदी संसद भवनातील खोली क्रमांक ६३ मध्ये आधी खासदारांच्या मतांची मोजणी झाल्यानंतर त्यांची घोषणा करतील. त्यानंतर १० राज्यातून मिळालेल्या मतांची मोजणी झाल्यानंतर त्यांची माहिती दिली जाईल. सुत्रांच्या माहितीप्रमाणे २० राज्यातील मतांची मोजणी झाल्यानंतर पुन्हा निकालाची माहिती दिली आणि सर्व मतांची मोजणी झाल्यानंतर निकाल घोषित केला जाईल.
राष्ट्रपती निवडणूक : मतपेट्यांवर ‘मिस्टर बॅलेट बॉक्स’
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर सर्व विधानसभांतील मतपेट्या मंगळवारी संसदेच्या स्ट्राँग रुममध्ये नेण्यात आल्या. राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांच्या निगरानीखाली विमानाने या मतपेट्या दिल्लीत नेण्यात आल्या. निवडणूक आयोगाकडून सीलबंद मतपेट्यांचे फोटोही शेअर करण्यात आले. या प्रत्येक मतपेटीसाठी मिस्टर बॅलेट बॉक्स नावाने एक ई-तिकीट जारी करण्यात आलेलं होतं.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत १३ खासदार, आमदारांनी केलं नाही मतदान
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार १८ जुलै रोजी ९९ टक्के मतदान झालं. भाजपचे खासदार सनी देओल आणि संजय धोत्रे यांच्यासह ८ खासदार मतदान करू शकले नाही. सनी देओल उपचारासाठी परदेशात आहे, तर संजय धोत्रेही आजारामुळे आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
राष्ट्रपती निवडणुकीत मतदान न करणारे खासदार कोण?
१) अतुल सिंह (सध्या तुरुंगात आहेत)
२) संजय धोत्रे (आजारी असल्यानं आयसीयूमध्ये आहेत)
३) सनी देओल (शस्त्रक्रियेसाठी परदेशात आहे)
४) गजानन किर्तीकर (प्रकृती बरी नाही)
५) हेमंत गोडसे
६) फजलुर रहमान
७) सादिक मोहम्मद
राष्ट्रपती निवडणुकीत मतदान न करणारे ५ आमदार कोण?
१) नैना सिंह चौटाला (जेजेपी आमदार परदेशात आहेत)
२) राजकुमार राऊत (भारतीय ट्रायबल पक्ष, राजस्थान)
३) भंवर लाल शर्मा (काँग्रेस, राजस्थान)
४) सत्येंद्र जैन (आप, दिल्ली. सध्या तुरुंगात आहेत.)
५) हाजी युनूस (आप, दिल्ली)
ADVERTISEMENT