काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला पार पडणार आहे. तर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड १९ ऑक्टोबरला निकाल प्रक्रियेनंतर केली जाईल. ज्या उमेदवाराला जास्त मतं पडतील तो उमेदवार काँग्रेसचा राष्ट्रीय अध्य़क्ष म्हणून निवडला जाणार आहे. मल्लिकार्जुन खरगे विरूद्ध शशी थरूर अशी लढत होणार आहे. यात खरगे यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. अशात G23 मधले महत्त्वाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गांधी घराण्याला एक इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
…तर अशोक गहलोत यांनाही विरोध! काँग्रेसला फुलटाईम अध्यक्ष हवा, पार्टटाईम नाही; पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण यांनी गांधी घराण्याला काय इशारा दिला आहे?
पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलं आहे की जो नवा काँग्रेस अध्यक्ष निवडला जाईल त्याला काम करू दिलं पाहिजे. राहुल गांधी यांनी जबाबदारीशिवाय ढवळाढवळ केली तर आम्ही प्रश्न विचारू असा इशारा दिला आहे. गांधी कुटुंबालाच त्यांनी हा इशारा दिला आहे. काँग्रेस पक्षात इतक्या वर्षांनी या निवडणुका घेतल्या जात आहेत. यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल यासाठीच आम्हीही या निवडणुकांसाठी आग्रही होतो. पुढे काय घडेल हे आत्ता सांगणं कठीण आहे. अध्यक्ष निवडून आल्यानंतर त्यामध्ये बाहेरून ढवळाढवळ केली तर आम्ही प्रश्न उपस्थित करू. आत्ताच आम्ही असंच घडेल असं गृहित धरून चाललो नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
काँग्रेसचे नेते आज भारतात जात आहेत, लोकांना भेटत आहेत ही चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारच्या यात्रा आयोजित करणं सोपं नाही. ही यात्रा प्रत्येक राज्यात जात नाहीये. थोडी वेगळी योजना आखता आली असती असं काही लोकांना वाटतं त्यात मीदेखील आहे. निवडणूक होणाऱ्या राज्यांमधूनही भारत जोडो यात्रा जायला हवी होती. असा मेसेज जाता कामा नये की इथे निवडणूक आपण सोडून दिली आहे असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक शशी थरूर विरूद्ध मल्लिकार्जुन खरगे
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची कालची शेवटची तारीख होती. याच तारखेला वाईल्ड कार्ड एंट्री म्हणता येईल ती झाली. मल्लिकार्जुन खरगे यांनी ती वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. त्याआधी म्हणजेच गुरूवारी मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी तसंच सोनिया गांधी यांच्यात सविस्तर चर्चा झाली होती. त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे हे या स्पर्धेत आले. मल्लिकार्जुन खरगे गांधी घराण्याने दिलेले उमेदवार आहेत त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जाते आहे. आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
नकारात्मक विचार आम्ही करत नाही
आम्ही असं गृहित धरून चाललेलो नाही की नव्या अध्यक्षांना काम करून दिलं जाणार नाही. मात्र त्यांच्या निर्णयांमध्ये किंवा कामकाजात जर ढवळाढवळ केली तर आम्हाला प्रश्न उपस्थित करावे लागतील असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी हे भाष्य केलं आहे. कुठलाही नकारात्मक विचार आम्ही करत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT