प्रविण ठाकरे, नाशिक: नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् यांनी आता भोंग्यासंबंधी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर धार्मिक प्रथा रीतिरिवाज यांचा विचार करता आणि विविध ठिकाणी धार्मिक तेढ वाढल्याने झालेले संघर्ष बघता काही महत्वाचे आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास थेट 4 महिने तुरुंगवास किंवा हद्दपारीची कारवाई होऊ शकते. असंही पोलीस आदेशात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
3 मे च्या आता सर्व धार्मिक ठिकाणच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार. यामध्ये मुस्लिम धर्मीयांनाही देखील परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच नियमात असणाऱ्या आवाजाच्या मर्यादेतच भोंगे लावता येणार आहेत.
तसेच परवानगी घेतल्यास अजानच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी व नंतर हनुमान चालीसा यांचं पठण करता येणार नसल्याचं आदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे. तसेच हनुमान चालिसा पठण हे मशिदीपासून कमीत कमी 100 मीटर अंतरावर करावे लागणार आहे.
यापैकी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास 4 महिन्यापर्यंत कैद होऊ शकते. तर आवाजाच्या मर्यादेच्या नियमाचे उल्लंघन झाल्यास 2015 च्या कोर्ट निर्णयानुसार कारवाई होणार आहे.
पाहा नाशिक पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात नेमकं काय म्हटलं आहे.
1. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मशिदीसमोर हनुमान चालीसाचे पठणचा कोणत्याही प्रस्थापित प्रथांचा अधिकार नसून तो फक्त सामाजिक तेढ व धार्मिक तंटा निर्माण करण्याचे हेतूने करण्यात आलेला असून नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत मशिदीचे 100 मीटर परिसराच्या आत ध्वनी क्षेपकाद्वारे (Loudspeaker) अजानचे वेळी (पहाटे 5 वाजता, दु. 1.15 वा, सायंकाळी 5.15 वाजता, 6.30 वा. आणि रात्री 8.30 वा.) चे 15 मिनिटपूर्व व 15 मिनिटनंतर हनुमान चालीसा किंवा इतर कुठल्याही प्रकारचे भजन, गाणे किंवा इतर भोंगे व इतर वाद्याद्वारे प्रसारित करण्यास मनाई.
2. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय प्रत्येक मशिद, मंदिर गुरुद्वारा, चर्च व इतर धार्मिक स्थळ आस्थापनांना भोंगे/ध्वनी प्रक्षेपण यंत्र लावण्यासाठी पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्याकडे अर्ज करावे व लेखी मंजुरी आदेश प्राप्त झाल्यानंतरच भोंगे/ध्वनी प्रक्षेपण यंत्राचा वापर करावा. हा आदेश 3 मे 2022 पासून अंमलात येईल.
3. प्रस्थापित प्रथा व मा. सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्व लक्षात घेता नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व अजानसाठी भोंग्यातून आवाज देण्याची परवानगी (ध्वनी पातळी 21 एप्रिल 2009 चे शासन निर्णय व 18 जुलै 2005 मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार असावी) देण्यात येत आहे.
4. ज्या पक्षकार यांना असे वाटत असले की, मशिदीची सकाळचे 5 वाजेची अजान प्रस्थापित प्रथा व मा. सर्वोच्च न्यायालयाचे दिलेले मार्गदर्शक तत्वचे परस्पर विरोधात आहे, असे पक्षकार (महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा सुन्नी मर्कज सिरत कमिटी नाशिक किंवा इतर नागरिक) यांनी या संदर्भात सक्षम न्यायालयाकडून आदेश प्राप्त करुन घ्यावे आणि पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे लक्षात आणून द्यावे.
5. सदर आदेश हा तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येत आहे. मात्र मंदिर, मशिद, गुरुद्वारा, चर्च व इतर धार्मिक स्थळ यांना 3 मे 2022 पर्यंत भोंगेसाठी परवानगी घेण्याची मुभा असेल. त्यानंतर सर्व गैरकायदेशीर भोंगे जप्त करण्यात येईल व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
6. आदेशाचे पालन न केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 40 (1) अन्वये उल्लंघन केलेले आहे असे गृहित धरुन कार्यवाही करण्यात येईल. ज्यामध्ये कमीत कमी 4 महिने तुरुंगवास जो 1 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकेल व द्रव्य दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.
7. जर पोलीस आयुक्त, नाशिक यांना योग्य वाटल्यास तर या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (1) व्यतिरिक्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 (1) अन्वये तडीपारीची कारवाई करण्यात येईल आणि विशेष परिस्थितीमध्ये Maharashtra Prevention of Communal, Anti Social and other Dangerous Activities Act 1980 अंतर्गत Preventive Detention ची कारवाई केली जाऊ शकते व तिचा कालावधी 6 महिन्यांपर्यंत असून शकतो.
Raj Thackeray Pune: ..तर आम्ही शांत बसणार नाही, दगड आम्हालाही हातात धरता येतो: राज ठाकरे
भोंग्यांवरून तापलेले राजकारण आणि धार्मिक तेढ यानंतर राज्यात प्रथमच अशा स्वरुपाचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिकनंतर आता राज्यभर अशाच स्वरुपाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT