पुणे महापालिकेची मुदत संपल्यानंतर आता महापालिकेची सत्ता प्रशासकाकडे आली आहे. त्यामुळे प्रशासनाने पुण्यातील अतिक्रमणांवर पुन्हा एकदा जेसीबी चालवण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कारवाई सुरू असून, आज धानोरी भागात अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.
ADVERTISEMENT
पुण्यातील धानोरी भागात कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना आज घडली आहे. कारवाईसाठी गेलेल्या पथकावर स्थानिकांनी हल्ला करत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या सर्व प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
पालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाकडून धानोरीत दुपारी दीडच्या सुमारास संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये पदपथावरील, पथारी व्यावसायिक विक्रेत्यांची अतिक्रमणे ताब्यात घेण्यापासून सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर इमारतींना लागून केलेल्या पत्राशेड व इतर तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणांवरही जेसीबी यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. याचवेळी काही जणांनी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध सुरु केला. काही जणांनी जेसीबीवर दगडफेक केली. काही जणांनी थेट अधिकाऱ्यांवरच हात टाकला. अधिकाऱ्यांना धुक्काबुक्की करण्यात आली.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पालिका अधिकारी जागेवरून दूर निघून गेले, तर जेसीबी चालकही जेसीबी सोडून निघून गेला. पालिकेच्या कारवाईत झालेली नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय जेसीबी यंत्राचा ताबा सोडणार नसल्याचा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिकेचे प्रशासक विक्रम कुमार यांनी अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई होईल, असं सांगितलं होतं. या प्रमाणे शहरात अनेक ठिकाणी कारवाई सुरु आहे.
ADVERTISEMENT