पुणे: कौटुंबिक वादाच्या कारणातून जावयाने सासऱ्यावर चाकूने अनेक वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यात भरदिवसा एका दुकानात हा थरार घडला. सासऱ्याच्या हत्येनंतर जावयाने हातात चाकू घेऊन पोलीस ठाणे गाठत खडकी पोलिसांना स्वत:च खुनाची कबूली देत आत्मसमर्पण देखील केलं आहे.
ADVERTISEMENT
रमेश रामचंद्र उत्तरकर (वय 65 वर्ष) रा. आकाशदिप सोसायटी खडकी असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अशोक गुलाब कुडले (वय 38 वर्ष) रा. खडकी बाजार असे आरोपी जावयाचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
38 वर्षीय अशोक कुडले हा रमेश उत्तरकर यांचा जावई आहे. 2019 पासून कुडले व त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वाद सुरू होते. तेव्हापासूनच पती-पत्नी वेगवेगळे राहत होते.
अशोक कुडले हा त्याच्या आईसोबत तर त्याची पत्नी ही आपल्या वडिलांकडे म्हणजेच रमेश उत्तरकर यांच्याकडे राहत होती. या दाम्पत्याला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्यही आहेत.
रमेश उत्तरकर हे तसे सधन होते. कारण पुण्यातच त्यांची दोन दुकानं आहेत आणि ही दोन्ही दुकाने त्यांनी भाड्याने दिली आहेत. तर अशोक कुडले हा वडापावचा व्यवसाय करतो.
दरम्यान, अशोक आणि त्याच्या पत्नीमध्ये जो वाद होता तो कोर्टापर्यंत पोहचला होता. त्यांचा हा वाद गेल्या तीन वर्षांपासून न्यायप्रविष्ठ आहे. अशोक कुडले हा मागील अनेक दिवसांपासून आपल्या सासरे रमेश उत्तरकर यांना आपल्या पत्नीला त्याच्या घरी नांदायला पाठवा असे सातत्याने सांगत होता.
पण आपण मुलीला पुन्हा त्या घरी पाठवणार नाही असं उत्तरकर हे सांगत होते. एवढंच नव्हे तर मुलीने अशोककडून घटस्फोट घ्यावा यासाठी देखील ते आग्रही होते. याच प्रकरणी काल (बुधवार) न्यायलयात तारीख होती.
Crime: सासरवाडीत येऊन जावयाने केली सासूची हत्या
न्यायालयात तारखेला हजर राहिल्यानंतर कुडले आणि उत्तरकर यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. अखेर न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर जावई अशोक कुडले याने रागाच्या भरात थेट दुकानात जाऊन सासरे रमेश उत्तरकर यांच्यावर चाकूने सपासप वार केले. सासऱ्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अशोकने थेट त्यांच्या छातीतच चाकू भोसकला. हा हल्ला एवढा भीषण होता की, रमेश उत्तरकर यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, हा खुनाचा सगळा थरार दुकानातील सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाला आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की, अशोक कुडले याने कशाप्रकारे आपल्या सासऱ्यांची हत्या केली आहे. सध्या पुणे पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT