Pune Mayor मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

मुंबई तक

• 03:15 AM • 07 Aug 2021

महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. या अकरा जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. पुण्यातले निर्बंध शिथील व्हावेत यासाठी तिथले दुकानदार आणि व्यावसायिकही आक्रमक झाले आहेत. सध्याच्या घडीला पुण्यात लेव्हल थ्रीचे निर्बंध आहेत. त्यानुसार दुकानं ४ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मुभा आहे. ही मुदत रात्री आठ वाजेपर्यंत वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे. याच संदर्भात […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. या अकरा जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचाही समावेश आहे. पुण्यातले निर्बंध शिथील व्हावेत यासाठी तिथले दुकानदार आणि व्यावसायिकही आक्रमक झाले आहेत. सध्याच्या घडीला पुण्यात लेव्हल थ्रीचे निर्बंध आहेत. त्यानुसार दुकानं ४ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मुभा आहे. ही मुदत रात्री आठ वाजेपर्यंत वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे. याच संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे.

हे वाचलं का?

पुण्यातल्या दुकानं ही रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावीत ही प्रमुख मागणी या पत्रात करण्यात आली आहे. एवढंच नाही तर पुण्यातल्या निर्बंधांमध्ये शिथीलता मिळावी अशीही मागणी करण्यात आली आहे. पुण्यात जे निर्बंध लागू आहेत ते लेव्हल थ्रीचे निर्बंध आहेत. इतर 25 जिल्ह्यांमध्ये लेव्हल वनचे निर्बंध आहेत. पुण्यातल्या निर्बंधांच्या विरोधात पुण्यात मागच्या तीन दिवसांपासून व्यापारी महासंघाकडून रात्री आठपर्यंत दुकानं सुरू ठेवून निषेध व्यक करण्यात येतो आहे. पुणेकरांना लवकरच दिलासा मिळेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. मात्र पुण्यातले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकर व्यावसायिक नाराज झाले आहेत.

पुणेकरांनी स्वाक्षरी मोहीम राबवली, दुकानांसमोर घंटानाद आंदोलन करून व्यापाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधले. खटले भरा, हरकत नाही पण बुधवारपासून दुकानं रात्री आठपर्यंत सुरू ठेवू असा आक्रमक पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला. त्यानुसार बुधवारी लक्ष्मी रोडवर व्यापाऱ्यांकडून दुकानं उघडी ठेवण्यात आली होती. गुरूवारीही दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. मात्र दुपारी चार नंतर पोलिसांचं पथक आणि अधिकारी फिरत असल्याने तासाभरात दुकानं बंद करण्यात आली.

महाराष्ट्र सरकारला गणपती बाप्पाने सुबुद्धी द्यावी यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते महाआरती करून साकडं घालण्यात आलं. त्यानंतर लक्ष्मीरोडवर मोर्चाही काढण्यात आला होता. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात निर्बंध शिथील करा आणि पुणेकरांना न्याय द्या अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीला राजेश टोपे काय प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp