समीर शेख, पिंपरी-चिंचवड
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवडच्या निगडी पोलिसांनी 2 अशा महिलांना अटक केली आहे ज्या रेल्वे विभागात नोकरी लावण्याचे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करत असे. या महिलांच्या विरोधात निगडी परिसरात राहणाऱ्या सुमित्रा सुशील घुले या 32 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
या गुन्ह्याबाबत अधिक माहिती देत असताना पिंपरी-चिंचवड शहराचे उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या 2 महिलांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. माधुरी संदीपान पवार (मूळगाव बेलवडे ता.कराड जि. सातारा) व संजीवनी निलेश पाटणे (रा. नेसरी ता. गडिंग्लज जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या या महिलांची नावे आहेत.
पीडित महिला सुमित्रा हिचे निगडी येथे ब्युटी सलून आहे आणि तिथेच माधुरीची तिची ओळख झाली व काही दिवसांनी ही ओळख मैत्रीमध्ये बदलली. मी रेल्वे विभागात तिकीट चेकर (T.C) आहे असे सांगून माधुरी ने T.C चे कपडे, आयकार्ड दाखवून सुमित्राचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर तिने सुमित्राला असेही सांगितले की तिची मैत्रीण संजीवनी पाटणे ही देखील रेल्वे विभागातील D.M.R कार्यालयात पुणे येथे नोकरी करत असून तुम्हालाही आम्ही येथे नोकरी मिळवून देऊ शकतो. असे सांगितल्याने सुमित्राने देखील माधुरीवर विश्वास ठेवत आपली शैक्षणिक कागदपत्रे व 8 लाख 50 हजार रुपये रेल्वे विभागात नोकरी मिळवण्याकरिता माधुरीला दिले.
त्यानंतर काही महिने उलटून गेले तरीही सुमित्राला रेल्वे विभागातून नोकरीचा कॉल आला नाही. त्यानंतर तिने माधुरीच्या मोबाईल फोनवर संपर्क साधला असता माधुरी सुमित्राकडे दुर्लक्ष करत होती.
त्यानंतर सुमित्राला समजलं की, माधुरीने तिला फसवलं आहे. तेव्हा तिने त्वरित निगडी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन माधुरीच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यावर तत्परता दाखवत तांत्रिक विश्लेषणच्या आधारावर निगडी पोलिसांनी माधुरीला आपल्या ताब्यात घेतले व पोलिसी खाक्या दाखवत या गुन्ह्याची उकल केली.
तेव्हा माधुरीने निगडी पोलिसांना या गुन्ह्याची कबुली देत असे सांगितले की, संजीवनी निलेश पाटणे या आपल्या मैत्रिणीचा देखील सदरच्या गुन्ह्यात सहभाग आहे. त्यानंतर पोलिसांनी संजीवनीलाही ताब्यात घेत तिच्या घराची झडती घेतली. तेव्हा पोलिसांनी सदरच्या ठिकाणावरून 10 लोकांचे शैक्षणिक कागदपत्रे, रेल्वे विभागाचे बनावट ओळखपत्रे, T.C च्या गणवेशासह बनावट नंबराचे बिल्लेही जप्त केले.
या प्रकरणाची माहिती मिळताच आणखी 2 महिलांनी ही माधुरी आणि संजीवनीच्या विरोधात अशाच प्रकारे आपली फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. तर एकूण 18 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याची कबुली स्वतः माधुरी व संजीवनी यांनी पोलिसांना तपासादरम्यान दिली आहे.
नाशिक : स्वस्तात सोनं देण्याचं अमिष दाखवून व्यापाऱ्याला ७५ लाखांचा गंडा
दरम्यान, अशाच प्रकारचा एक गुन्हा यापूर्वीही सांगलीमध्ये या दोघींच्या विरोधात दाखल असल्याची माहिती ही आता पुढे आली आहे. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड पोलीस त्या 10 लोकांना शोधत आहेत ज्यांचे शैक्षणिक कागदपत्रे या दोन्ही महिलांच्या घरी आढळून आली होती.
ADVERTISEMENT